मजुरांची टंचाई लक्षात घेता सद्य:स्थितीत छोटे आणि मोठे ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीसाठी उपलब्ध आहेत. मशागत लवकर होत असल्याने शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टरकडे वाढला होता मात्र ट्रॅक्टरला लागणाऱ्या डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे ट्रॅक्टरचालक आणि शेतकरी अडचणीत सापडले आहेत. डिझेल दरवाढीमुळे मशागतीच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करणे परवडत नाही. मजुरीचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतामध्ये नांगरणी, कोळपणी, नांगरणी, काकऱ्या, रेझर यांचा वापर केला जातो.
छोट्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने आंतर मशागत करण्याचा भाव हजार रुपये ते बाराशे रुपये होता मात्र, डिझेलचे दर भडकल्याने आता एकरी १४०० ते १५०० रुपये शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आता ट्रॅक्टरऐवजी बैलजोडीच्या मशागतीला प्राधान्य देत आहेत. सध्या कपाशी, ऊस व अन्य पिकांमध्ये मशागतीचे काम सुरू आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे गवताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे खुरपणी ऐवजी शेतकरी तणनाशककडे वळला आहे. तण काढण्यासाठी एकरी सात ते दहा हजार रुपये एवढा मजुरांचा दर आहे. त्यामुळे बैलाच्या साहाय्याने मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला आहे.
..................
ट्रॅक्टर आणि बैलजोडीच्या साहाय्याने शेतीबरोबरच इतरांच्या शेतीतही मशागत केली जात आहे. ट्रॅक्टरद्वारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल होता. डिझेल वाढल्यामुळे मशागतीचे दरही वाढले आहे. त्यामुळे शेतकरी आता बैलजोडीद्वारे आंतरमशागत करण्याकडे कल वाढू लागला आहे.
-नानासाहेब ऊडे, अवजार चालक, राहुरी
...............
डिझेल दरवाढीमुळे ट्रॅक्टरच्या साह्याने पिकांमधील अंतर्गत मशागतीचे भाव गगनाला भिडले आहे. तसेच खुरपणीचा खर्च वाढल्याने बैलजोडीच्या साह्याने पिकांमधील अंतर्गत मशागतीचे काम सध्या केले जात आहे. त्यातल्या त्यात ट्रॅक्टरचलित यंत्रापेक्षा बैलजोडीच्या साह्याने मशागत उत्कृष्ट होत आहे. डिझेलचे भाव कमी व्हावे हीच अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
-जयंत साळवे, शेतकरी, बारागाव नांदूर, राहुरी
240721\img-20210724-wa0207.jpg
डिझेल ने शंभरी गाठल्यामुळे शेतामध्ये मशागतीसाठी बैल जोडी अवजारकडे शेतकऱ्यांचा वाढला कल