सुपा : गर्दीची ठिकाणे, वाढलेली अतिक्रमणे, वाहनांची वर्दळ, पादचाऱ्यांची वाट मिळविण्यासाठी चाललेली धडपड, दुचाकीस्वारांची घाई यातून घडणाऱ्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी सुपा (ता. पारनेर) येथील बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावरील शहजापूर चौकापर्यंत अतिक्रमणे हटविण्यासाठी धडक मोहीम हाती घेतली जाणार आहे. सुपा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून ही कारवाई होणार असून, त्यांनी अतिक्रमणधारकांना तशा सूचनाही दिल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कोसे यांच्यासह जवळपास २० जणांच्या पथकाने अचानक बसस्थानक चौकात फिरून अतिक्रमणधारकांना अतिक्रमण हटविण्यासाठी सूचना दिल्या व कार्यवाही करण्यास सांगितले. रस्त्यालगत असलेल्या टपऱ्यांच्या माध्यमातून विविध व्यवसाय चालतात. त्यात हॉटेलपासून अनेक प्रकारची दुकाने थाटल्याने त्यांच्या समोर वाहने उभी करून ग्राहकांची गर्दी जमते. दोन्ही बाजूला अशी गर्दी होत असल्याने ये-जा करणाऱ्या वाहनांना मार्ग काढणे अवघड होते. वाहतुकीतील या कोंडीकडे कुणाचेच लक्ष नसते. यातून घडणाऱ्या अपघातातून एखाद्याचा जीव गेला, त्याला अपंगत्व आले, मार लागला तर त्या कुटुंबाची वाताहत होते. याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे थेट पोलीस प्रशासनानेच ही मोहीम हाती घेतली आहे.
सुपा बसस्थानक चौकात असणाऱ्या टपऱ्यांच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगार मिळतो. मध्यंतरी अशीच अतिक्रमण हटाव मोहीम राबवली गेली. त्यावेळी बरेच दिवस त्यांचा रोजगार हिरवला गेला होता. त्यामुळे या तरुणांनाही इतर ठिकाणी व्यवसायासाठी पर्याय मिळवून द्यायला हवा, अशी मागणी पुढे येत आहे.
--
नागरिकांचे सहकार्य हवे...
सुपा पोलीस ठाण्यामध्ये सर्व गुन्ह्यांचा विचार करता अपघातांचे व त्यात बळी जाणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हे थांबवण्यासाठी अतिक्रमण हटवले तर रस्ता मोकळा श्वास घेईल. वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल. त्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांनी केले आहे.
फोटो ०४ सुपा
पारनेर तालुक्यातील सुपा बसस्थानक चौकात अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.