लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीरामपूर : शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळावर नियुक्ती करताना रतन टाटा, नीता अंबानी किंवा आनंद महिंद्रा यांच्यासारखी विकासाची मोठी दृष्टी असलेले लोक नियुक्त करावेत, अशी सूचना भाजप खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे.
श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत रविवारी खासदार डॉ. विखे बोलत होते. संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या निवडीचा वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. राज्य सरकारने या निवडीपूर्वी संस्थानच्या कायद्यात काही दुरूस्त्या केल्या आहेत. नवीन मंडळाची नियुक्तीसाठी सरकारने न्यायालयाकडून ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ मिळविली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या निवडीकडे लक्ष लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर डॉ. विखे यांनी ही भूमिका मांडली आहे.
साई संस्थानच्या विश्वस्त मंडळावर राजकीय व्यक्तींना स्थान द्यायला हवे का, असा प्रश्न विखे यांना विचारला असता, ते म्हणाले, कोणत्याही राजकीय पक्षांशी संबंधित असाे किंवा नसो, मात्र मोठा दृष्टीकोन असलेले लोक संस्थानवर घेतले पाहिजे. उद्योजक नीता अंबानी, रतन टाटा, आनंद महिंद्रांसारखे लोक संस्थानला अधिक बळकट करू शकतील. दर्शन रांगेतील पास किंवा इतर कोणत्याही कामकाजांमध्ये ही मंडळी हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे संस्थानच्या कार्यपद्धतीत मोठा बदल घडून येऊ शकेल. केवळ उद्योगपतीच नाही तर कायद्यातील काही तज्ज्ञ लोकांचीही संस्थानवर निवड केली तर ती स्वागतार्ह ठरेल.
..........
नव्या सहकार खात्याकडे इडीसारखे का पाहता
केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात नव्याने तयार करण्यात आलेल्या सहकार खात्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. केंद्राने कोणताही नवीन धोरणात्मक निर्णय घेतला की विरोध, आरोप करत सुटतात. सहकार क्षेत्रातील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी हे खाते तयार करण्यात आले आहे. मात्र, काही मंडळींना ते दुसरे अंमलबजावणी संचालनालय (ईडी) असल्याचा भास होतो आहे, असे डॉ. विखे म्हणाले.
------
आम्ही सहकार जगविला
राज्यात सहकारी साखर कारखानदारीची आता खासगीकरणाकडे वाटचाल सुरू झाली आहे. ती आता थांबणार नाही. राज्यातील सरकारमधील काही नेत्यांचे खासगी साखर कारखाने आहेत. त्यांचा सहकाराशी संबंध नाही. आम्ही मात्र राहुरी व गणेश चालवायला घेऊन सहकार जगविण्याची भूमिका जपली, असे खासदार डॉ. विखे यांनी स्पष्ट केले.