अहमदनगर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडियन मुस्लीम काँग्रेस पार्टीसह जिल्ह्यातील १९ आघाड्यांची मान्यता बुधवारी रद्द करण्यात आली आहे़ त्यामुळे बहुतांश तालुक्यांतील ‘सोधा’ पक्षाला मोठा दणका बसला असून, निवडणुकीच्या तोंडावरच आघाडी स्थापन्यासाठी त्यांना पुन्हा धावाधाव करावी लागणार आहे़ जिल्ह्यातील बड्या नेत्यांनी राजकीय सोयीसाठी ठिकठिकाणी विकास आघाड्या स्थापन केल्या़ विकास आघाडी स्थापन करून बड्या नेत्यांनी जिल्ह्यात राजकीय बस्तान बसविले़ विकास आघाड्यांचे डावपेच यशस्वी होत गेले़ त्यामुळे जिल्ह्यात विकास आघाड्यांचे एकप्रकारे पेवच फुटले होते़ मात्र, या आघाड्यांवरच आता गंडांतर आले असून, राज्य निवडणूक आयोगाने नगर जिल्ह्यातील १९ विकास आघाड्या रद्द करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला़ मान्यता रद्द करण्यामागे आयकर विवरणपत्र आणि लेखा परिक्षणाचे लेखे सादर न केल्याचे कारण आयोगाने दिले आहे़ त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वरील निर्णय घेण्यात आला आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांत आघाड्या राजकारणातून हद्दपार झाल्या आहेत़ निवडणुकांच्या तोंडावर विकास आघाड्यांची मान्यता रद्द झाल्याने अनेकांची गोची होणार आहे़ नगर जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील आठ पालिकांच्या निवडणुका आहेत़ आघाडी करून निवडणुका लढविण्याचे अनेकांचे मनसुबे यामुळे उधळले गेले आहेत़ (प्रतिनिधी)या विकास आघाड्यांची मान्यता रद्दनेवासा तालुका विकास आघाडी, पारनेर तालुका विकास आघाडी, राहाता तालुका विकास आघाडी, कोपरगाव तालुका विकास आघाडी, कर्जत तालुका विकास आघाडी, जामखेड तालुका विकास आघाडी, श्रीगोंदा तालुका विकास आघाडी, राहुरी तालुका विकास आघाडी, संगमनेर तालुका विकास आघाडी, श्रीरामपूर तालुका विकास आघाडी, पाथर्डी तालुका विकास आघाडी, नगर तालुका विकास आघाडी, शेवगाव तालुका विकास आघाडी, अकोले तालुका विकास आघाडी, जनसेवा विकास आघाडी, लोकसेवा विकास आघाडी, परिवर्तन समता परिषद, लोकशक्ती विकास आघाडी, जय तुळजा भवानी नवनिर्मित सेना़नगर शहरातील इंडियन मुस्लीम काँग्रेस पार्टीची मान्यता राज्य निवडणूक आयोगाने रद्द केली आहे़ या पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली़ परंतु आयकर विवरपण पत्र सादर केले नाही़ त्यामुळे या पक्षाची मान्यता रद्द झाली आहे़
विकास आघाड्या हद्दपार
By admin | Updated: July 14, 2016 01:25 IST