अहमदनगर : डेंग्यू झालाय असे लक्षात आले आणि तुम्ही धडधाकट असाल तर दवाखान्यातही जायची गरज नाही. डेंग्यू हा आजार घरीच बरा होण्यासारखा आजार आहे. त्यामुळे त्यामध्ये घाबरण्यासारखे काहीही नाही. तर भरपूर पाणी प्या, घरीच आराम करा आणि काहीही खा, असा सल्ला नगर येथील तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी दिला आहे.शहरात सध्या डेंग्यूची साथ सुरू आहे. ताप आला तरी लोक घाबरत आहेत. त्यामुळे हा डेंग्यू नेमका आहे तरी काय? याबाबत नगर येथील तज्ज्ञ डॉ. गोपाळ बहुरुपी यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला.प्रश्न : डेंग्यू नेमका कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे कोणती?डॉक्टर : डेंग्यू हा विषाणुमुळे (व्हायरस) होतो. तो फ्लेव्ही व्हायरस आहे. टायगर मॉस्क्युटोपासून जास्त धोका आहे. साचलेल्या पाण्यात डासांची निर्मिती होते. तेथील डासांचा दंश झाल्याने हा आजार वाढतो. ताप येणे, डोके दुखणे, हातपाय गळणे, पोट दुखणे, उलट्या होणे, अंगावर रॅश तयार होणे ही डेंग्यूची लक्षणे आहेत.प्रश्न: डेंग्यू होणार नाही, यासाठी काय करावे?डॉक्टर : डेंग्यूचे डास साचलेल्या पाण्यात निर्माण होतात. त्यामुळे घरात, घराभोवती, परिसरात साचलेले पाणी अजिबात ठेवू नयेत. पाण्याचे साठे तत्काळ नष्ट करावेत. दोन दिवसांपेक्षा जास्त साठविलेले पाणी वापरू नये. शक्यतो घराभोवती औषधांची फवारणी करून घ्यावी.प्रश्न: डेंग्यू झाला तर उपाय काय आहेत?डॉक्टर : या आजारांमध्ये पेशी वाढल्या की घटल्या याकडे अजिबात लक्ष देवू नये. पाणी भरपूर प्यावे. किमान ४ ते ५ लीटर पाणी पोटात जायला हवे आहे. खाण्याचे कोणतेही पथ्य नाही. घरीच आराम करावा. यामध्ये १०० पैकी ९० रुग्ण या प्रकारातीलच असतात.प्रश्न : मग डॉक्टरांकडे कोणी जावे?डॉक्टर: डेंग्यू झाला आहे आणि ज्यांचे वय १५ वर्षाच्या आत आणि ६० वर्षांच्या वर आहे, त्यांनी दवाखान्यात जावे. धडधाकट असाल तर घरीच उपाय करू शकता. ज्यांना संधीवात आहे, एखाद्या आजाराची औषधे सुरू आहेत, प्रतिकार शक्ती कमी आहे, मधुमेहाचे रुग्ण आहेत, किडनी फेल आहे, हृदयविकाराशी संबंधित आजार आहेत, फुप्फुसाचा आजार आहे अशांनीच डेंग्यू झाल्यास तत्काळ रुग्णालयात जावे. तरुणांना डेंग्यू झाल्यास दवाखान्यात जायची गरज नाही. तसेच यापूर्वी कोणाला डेंग्यू झाला आणि त्याला दुसऱ्यांदा डेंग्यू झाला असेल तर तत्काळ रुग्णालयात उपचार घ्यावेत. दुसऱ्यांदा डेंग्यू झाल्यास ते घातक आहे.प्रश्न : डेंग्यूमुळे मृत्यू होतो का? डॉक्टर : सर्वच प्रकारचे विषाणू घातक असतात. डेंग्यूच्या व्हायरस इन्फेक्शनमुळे जेवढे मृत्यू होतात, तेवढेच मृत्यू इतरही व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होतात. त्यामुळे डेंग्यूमुळे घाबरण्यासारखे काहीच नाही. पाणी पिणे आणि डासांचा प्रतिबंध करणे या दोन गोष्टी प्राधान्याने कराव्यात.
डेंग्यू झालाय... भरपूर पाणी प्या!
By admin | Updated: July 6, 2016 23:35 IST