शेवगाव : तालुक्यातील वरूर बुद्रूक येथील एका शाळकरी (इयत्ता आठवी) मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे नगर येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.अनिकेत रावसाहेब तुजारे (वय १४) असे मृत मुलाचे नाव आहे.अनिकेत तुजारे हा वरूर येथील एका माध्यमिक विद्यालयात आठवीच्या वर्गात शिकत होता. ताप आल्याने अनिकेतला शेवगावच्या खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथील डॉक्टरांनी दोन दिवस उपचार केले. अनिकेतला डेंग्यूचे निदान झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. येथे उपचार सुरू असतानाच शुक्रवारी पहाटे त्याची प्राणज्योत मालवली. वरू बुद्रूक व वरूर खुर्दमध्ये डेंग्युसदृश आजाराचे अनेक रुग्ण आहेत. मात्र, आरोग्य विभागाने वेळीच उपाययोजना न केल्याने विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे. दोन वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने कचरा उचलण्यासाठी खरेदी केलेली घंटागाडी बंद आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. अनिकेतच्या मागे आजी, आजोबा, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. वरूर येथील एका १४ वर्षाच्या मुलाचा डेंग्युमूळे मृत्यू झाला आहे. शेवगाव येथे रक्त तपासणी केली असता डेंग्युचा पॉझिटिव्ह अहवाल आला होता. त्याच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, असे शेवगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ सलमा हिराणी यांनी सांगितले.
शाळकरी मुलाचा डेंग्यूने मृत्यू; वरूर येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 18:44 IST