लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव नगरपरिषदेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. १ फेब्रुवारी) स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत सभागृहातील सर्वच सदस्यांनी अजेंड्यावरील इतर विभागांचे सर्वच विषय मंजूर केले. मात्र, कोल्हे गटाच्या भाजप, शिवसेनेच्या समितीच्या सदस्यांनी बांधकाम विभागातील रस्त्यांच्या कामाचे फेरअंदाजपत्रक तयार करून फेरनिविदा काढण्याची मागणी केली आहे.
या बैठकीत बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, संगणक विभाग, आरोग्य विभाग, रेकॉर्ड विभाग, भंडार विभाग यांसह एकूण ९ विषय अजेंड्यावर होते. त्यापैकी बांधकाम विभागाच्या रस्त्याच्या ३१ कामांपैकी एक रस्त्याचे, एक टॉयलेट ब्लॉक व खेळणी बसविणे अशी ३ कामे मंजूर केली आहेत, तर उर्वरित २८ रस्त्यांच्या कामांचे फेरअंदाजपत्रक तयार करून फेरनिविदा काढावी. त्यातून वाचणाऱ्या रकमेतून शहरातील इतरही रस्त्यांची कामे करण्यात यावीत, अशी मागणी बैठकीत करण्यात आली.
यावेळी भाजपचे उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे माहिती देताना म्हणाले, बांधकाम विभागाने शहरातील ज्या रस्त्यांच्या कामाचे टेंडर काढले आहे, त्या कामांची तांत्रिक मंजुरी ही जीवन प्राधिकरण कार्यालयातून घेतलेली आहे. ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेण्यात यावी. त्यानंतर या सर्व कामांची अव्वाच्या सव्वा असलेले अंदाजपत्रक पुन्हा तयार करून फेरनिविदा काढाव्यात. त्या रकमेतून सर्वच प्रभागांत समान वाटप करून नवीन कामे करावीत. ही सर्व कामे मिळून असणारे ४० लाखांचे आर्किटेक्ट शुल्क रद्द करावे. विशेष म्हणजे शहरातील नागरिकांसाठी ज्या रस्त्यांची प्रामुख्याने गरज आहे, त्या रस्त्यांची कामे न करता इतर रस्त्यांची कामे नियोजित केली आहेत. त्यामुळे अगोदरच्या सर्व कामांचे फेरअंदाजपत्रक तयार करावे तसेच अजूनही शहरातील गरज असलेल्या रस्त्यांच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करून फेरनिविदा काढून पुढील बैठकीत मंजुरीसाठी ठेवावे, आम्ही कामे मजूर करू, असेही निखाडे यांनी सांगितले आहे. यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी, स्थायी समितीचे सभापती, सदस्य उपस्थित होते.
.......
चौकट -
दरम्यान, मागील महिन्यात १२ जानेवारीला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत कोल्हे गटाच्या भाजप-शिवसेना नगरसेवकांनी शहरातील रस्त्यांची १२ कामे नामंजूर केली होती. त्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी चांगलेच भांडवल केले होते. त्यामुळे शहरात दहा-बारा दिवस चांगल्याच नाट्यमय घडामोडी रंगल्या होत्या. त्यामुळे या बैठकीतही आमचा कामांना विरोध नाही; मात्र कामाचे फेरअंदाजपत्रक तयार करून पुन्हा निविदा काढा, आम्ही मंजूर करू, अशी भूमिका भाजप-शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळे यावरही काही घडामोडी होतात का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.