अहमदनगर/शेवगाव : पोलीस कर्मचारी दीपक कोलते यांचा मारेकरी असलेला कुख्यात गुन्हेगार पिन्या उर्फ सुरेश भरत कापसे याला अखेर बीड पोलिसांनी बुधवारी अटक केली. गेल्या दीड वर्षांपासून पोलीस पिन्याच्या शोधात होते. पिन्याला अटक केल्याने कुख्यात गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे एक वर्तुळ पूर्ण झाल्याने नगर जिल्हा पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे गोदावरी पात्रात पाट क्रमांक २ या परिसरात ३ फेब्'ा्रुवारी २०१५ रोजी पोलीस कर्मचारी दीपक रावसाहेब कोलते यांनी पिन्याला गाठले आणि पोलिसांना शरण येण्याचे आवाहन केले. मात्र पिन्याने त्याचा साथीदार बप्पासाहेब रावसाहेब विघ्ने (रा. हसनापूर) याच्यासह पोलीस कर्मचारी कोलते यांच्या पोटावर व छातीवर गुप्तीचे वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कोलते यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पोलीस प्रशासन हादरले होते. राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षीत, गृहराज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही भेट देवून या घटनेची दखल घेतली होती. राज्यभर पथके पाठवून पिन्याचा शोध घेतला, मात्र त्यात अपयश आले होते. मोठ्या टोळ््या गजाआड केल्या, मात्र पिन्याला अटक करता आली नाही,अशी खंतही तत्कालीन पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी व्यक्त केली होती. दीड वर्षांपासून पिन्या सापडत नसल्याने दस्तुरखुद्द गृहराज्यमंत्री, पोलीस अधिकारी यांना टीका सहन करावी लागली होती.पिन्या कापसे याच्यावर नगर जिल्ह्यात दीपक कोलते याच्या खुनाचा गुन्हा दाखल होता. तसेच इतर घटनांमध्ये खुनाचा प्रयत्न, रस्तालूट, टोळीयुद्ध अशा प्रकारची गुन्हे दाखल होती. नगरसह मराठवाड्यातील पोलीस त्याचा कसून शोध घेत होते. पिन्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. या कारवाईत तो फरार होता. बीडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केल्याने पिन्या अखेर गजाआड झाला. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. शेवगावचे पोलीस उपनिरीक्षक सुहास हट्टेकर यांच्या नेतृत्वाखालील एक पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी बीडकडे रवाना झाले आहे.
दीपक कोलतेचा मारेकरी अखेर जेरबंद
By admin | Updated: June 2, 2016 23:05 IST