आश्वी : विवाहित लेकीच्या अपघाती मृत्युचे दु:ख सहन न झाल्याने वृध्द आईचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यात घडली. त्यामुळे रहीमपूर व धांदरफळ गावावर शोककळा पसरली. याप्रकरणी दोघा परप्रांतीयांना आश्वी पोलिसांनी अटक केली आहे. पिकांना पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून रहीमपूर येथील शेतकरी बापूसाहेब शिंदे यांनी रविवारी रात्री गट नंबर २९६ मध्ये कूपनलिका खोदाईचे वाहन बोलाविले होते. खोदकाम दरम्यान पाईप बदलले जात असताना आठच्या सुमारास वाहन(क्रमांक के.ए.०१, एल.एम. ७३७६) मधून कूपनलिकेचा लोखंडी पाईप निसटून आधी बापूसाहेब शिंदे यांच्या खांद्यावर व नंतर त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या पत्नी सुमन उर्फ नीता बापूसाहेब शिंदे यांच्या डोक्यात पडल्याने जबर मार लागून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर तातडीने संगमनेरच्या खासगी रूग्णालयात उपचार करून प्रकृती चिंताजनक असल्या कारणाने नाशिकला हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे तीन वाजण्याचा सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी मयत शिंदे यांच्या माहेरी धांदरफळला समजली. काही वेळाने अंत्यविधी होणार होता. मात्र लेकीच्या मृत्युचे दु:ख सहन न झाल्याने दुपारी त्यांची आई सखुबाई भाऊपाटील गुंजाळ यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचे निधन झाले. याप्रकरणी मयत शिंदे यांचे दीर गीताराम सूर्यभान शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आश्वी पोलिसांनी कूपनलिका वाहन चालक गोविंदास्वामी पंचमुथ्थु व आॅपरेटर विनोद विल्वराज रामास्वामी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. वाहन जप्त करून दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व हेड कॉन्स्टेबल एकनाथ बर्वे करीत आहेत.(वार्ताहर)
लेकीच्या निधन वार्तेने आईचाही मृत्यू
By admin | Updated: May 23, 2016 23:23 IST