अहमदनगर : गेल्या अडीच वर्षांपूर्वी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेला दरेवाडी-उक्कडगाव रस्ता जागोजागी उघडला असून, या रस्त्याच्या दुरुस्तीकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष झाले आहे.
दरेवाडी-उक्कडगाव या साडेसहा किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जानेवारी २०१८ मध्ये पूर्ण झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पावणेतीन कोटी रुपये खर्चून हे काम झाले. त्यामुळे गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेला हा रस्ता अखेर पूर्ण झाला; परंतु पुढे दोन वर्षांतच हा रस्ता जागोजागी उघडला. यंदाच्या पावसाळ्यात तर या रस्त्याची आणखी दुर्दशा झाली असून, रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्ता पूर्ण झाल्यापासून पुढे पाच वर्षे संबंधित रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित ठेकेदाराकडे असते; परंतु अद्यापही रस्ता दुरुस्तीकडे संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यात खड्डे पडल्याने मांडवा, उक्कडगाव, नारायणडोहो तसेच मराठवाड्यातून येणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.
------------------
शिराढोण ते सांडवा फाटा रस्त्याची वाट
शिराढोण ते मांडवा आणि मांडवा ते सांडवा अशा सहा किलोमीटर रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात खडीची वाहने जात असल्याने रस्त्यावर दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यावर सध्या मुरमाची मलमपट्टी केली असली तरी हा संपूर्ण रस्ता जवळजवळ नाहीसा झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
---------
फोटो मेल दरेवाडी उकडगाव रस्ता
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण झालेला दरेवाडी-उक्कडगाव रस्ता जागोजागी उघडला आहे.