कोपरगाव : पावसाने दडी मारल्याने खरीप पिके संकटात सापडली आहे. वारंवार मागणी करुन ही पाटबंधारे विभागाने शेतीची आवर्तने वेळेवर न सोडल्याने हाता तोंडाशी आलेली पिके नष्ट झाली आहेत. जी काही पिके अजून तग धरुन आहेत. अशा पिकांना पाटपाणी मिळाले तर शेतकऱ्यांना थोडा आधार मिळू शकतो, ही गरज लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे तातडीने आवर्तने सोडावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
परजणे म्हणाले, गेल्या दोन महिन्यापासून पावसाळा सुरु झालेला असला तरी मध्य महाराष्ट्रात व प्रामुख्याने नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात पाऊस पडलेला नाही. उर्वरित दोन महिन्यात पाऊस पडेलच याचीही शाश्वती नाही. अशीच परिस्थिती राहिल्यास येणारा रब्बी हंगाम सुद्धा धोक्यात येऊ शकतो.