श्रीगोंदा : कुकडी व घोड प्रकल्पातून फळबागांसाठी आवर्तन सोडावे, या प्रमुख मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने मंगळवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. काही वेळ तहसील कार्यालयाचे कामकाजही बंद करण्यात आले. आवर्तन सोडण्याविषयी निर्णय न झाल्यास कुकडीचे विभागीय कार्यालय बेमुदत बंद करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. युवक काँग्रेस नेते हेमंत ओगले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ते म्हणाले, कुकडी व घोड धरणात पाणी शिल्लक असताना आवर्तन सोडण्यावर सत्ताधारी पक्षाचे मंत्री, नेते राजकारण करीत आहेत. आठ दिवसात आंदोलनाचा निर्णय न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. कार्यकारी अभियंता सुभाष कोळी म्हणाले, कुकडी, घोडचे आवर्तन सोडण्याचा निर्णय मंत्रालय पातळीवर होणार आहे. यासंदर्भात पालकमंत्री राम शिंदे यांनी १५ मार्चनंतर बैठकीचे नियोजन केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार वंदना खरमाळे म्हणाल्या, घोड, कुकडीचे आवर्तन हा जलसंपदा खात्यांतर्गतचा विषय आहे. यावेळी बाळासाहेब मोहारे, समीर बोरा, कुमार लोखंडे, डॉ. गोरख बाचकर, सुभान तांबोळी, सचिन गायकवाड, विजय शेलार, प्रवीण ढगे, बापू नवले, प्रसाद काटे, भाऊसाहेब डांगे, वामन भदे, संदीप वागस्कर आदी उपस्थित होते. गेल्या काही वर्षापासून पावसाचे प्रमाण कमीे झाल्याने या भागात पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.(तालुका प्रतिनिधी)
कुकडी, घोडच्या आवर्तनासाठी ठिय्या
By admin | Updated: March 9, 2016 00:29 IST