लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून हाॅटेल, भोजनालय, शिवभोजन केंद्रांवरून केवळ पार्सल सुविधा देण्याचे निर्देश शासनाने प्रारंभी दिले होते. परंतु मध्यंतरी शिवभोजन केंद्रांची पार्सल सुविधा बंद करून थेट केंद्रामध्ये नागरिकांनी भोजन करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रांवर भोजनासाठी गर्दी होऊन कोरोनाचा धोका वाढला आहे. दरम्यान, पुन्हा पूर्वीप्रमाणे पार्सल सुविधा सुरू करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून होत आहे.
शिवभोजन ही राज्य शासनाची महत्त्वाची योजना असून यात प्रारंभी १० रुपयांना गरजू, तसेच ज्यांची जेवणाची सोय नाही अशांना शिवथाळी देण्यात येत होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १६ एप्रिल २०२१ पासून शिवथाळी पूर्णतः मोफत करण्यात आली. नगर जिल्ह्यात सध्या ३७ शिवथाळी केंद्र सुरू असून त्यापैकी १४ केंद्र नगर शहरात, तर २३ केंद्र ग्रामीण भागात आहेत. प्रत्येक केंद्राला दीडशे, दोनशे थाळी वाटपाचे उद्दिष्ट असून दररोज एकूण ६ हजार ५५० थाळ्या वाटप होतात.
------------
शिवभोजनाचे अनुदान रखडले
या थाळ्यापोटी शहरातील केंद्र चालकाला प्रत्येक थाळी मागे ५०, तर ग्रामीण भागातील थाळीला ३५ रुपये अनुदान मिळते. दर १५ दिवसांनी हे अनुदान केंद्रचालकांना वाटप करण्याच्या शासनाच्या सूचना असून जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभागातर्फे या योजनेचे नियोजन केले जाते. दर महिन्याला साधारण ७० ते ७५ लाख रुपये योजनेच्या अनुदानापोटी केंद्र चालकांना दिले जातात. परंतु मे, जून, जुलै असे अडीच महिन्यांचे अनुदानाचे वाटप झालेले नाही. अनुदान रखडल्याने शिवथाळी केंद्रचालक अडचणीत आले आहेत.
---------------
जिल्ह्यातील एकूण शिवभोजन थाळी केंद्र - ३७
रोज लाभार्थ्यांची संख्या - ६५५०
शहरातील केंद्र - १४
शहरातील रोज लाभार्थ्यांची संख्या - २७००
--------------------------------
कोणीही जात नाही उपाशी !
नगर शहरात १४ शिवथाळी केंद्र असून तेथे दररोज २७०० थाळ्यांची क्षमता आहे. दररोज या केंद्रांवर २६०० ते २७०० लोक भोजन करतात. कोणाही उपाशी जात नाही किंवा जेवण मिळाले नाही, अशी कोणतीही तक्रार नाही, असे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
------------
शिवभोजन थाळी योजना चांगली आहे. यात प्रत्येकाला मोफत जेवण मिळते. परंतु केंद्रावर जेवणासाठी खूप गर्दी होते. त्यातून कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने पार्सल सुविधा देणे गरजेचे आहे.
- सुदाम क्षेत्रे, शिवभोजन लाभार्थी
-----------------
मी दररोज भाजी विक्रीसाठी नगर शहरात येतो. भाजी विकल्यानंतर दुपारी एखाद्या केंद्रात जाऊन मोफत जेवण करतो. परंतु केंद्रावर गर्दी असते. आधीचे लोक उठले की लगेच दुसरे बसतात. अनेकजण कोरोनाचे नियम पाळत नाहीत. परिणामी कोरोना वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्यांना येथे भोजन करायचे नाही त्यांना पार्सल सुविधा द्यावी.
- गोरखनाथ खांदवे, शेतकरी
---------------
फोटो - २७ शिवभोजन गर्दी
नगर शहरातील एका शिवभोजन केंद्रावर झालेली गर्दी.