कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संस्थान प्रशासनाने मंदिरात दर्शनासाठी मर्यादित भाविकांनी सोडण्याची मुभा दिलेली आहे. नियमांचे पालन करत मंदिरात सोडले जाते. सुटी व सणाच्या कालाधीत गर्दीत भर पडत असल्याने संस्थानने भाविकांना ऑनलाइन पास काढूनच दर्शनास यावे. गर्दीच्या काळात पास वितरण केंद्र बंद ठेवले जातील, असे आवाहन केले होते. तरीही भाविकांनी संक्रांतीचे दिवशी अलोट गर्दी केली. विनाशुल्क व सशुल्क पास वितरण केंद्रावर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. श्रीराम पार्किंगमध्ये असलेल्या बायमेट्रिक पास केंद्रावर, तर भाविकांची मोठी झुंबड उडाली. दूर अंतरावर रांगा पास घेण्यासाठी लागल्या होत्या. भाविकांच्या या गर्दीचा फायदा काही एजंटानी घेतला. २०० रुपयांचा पास दोन हजार विकल्याचा प्रकार घडल्याने पासचा काळाबाजार करणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून आले. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, बसण्यासाठी जागा, सावली नसल्याने भाविकांचे हाल झाले. पास वितरण केंदावर असलेली गर्दी पाहून अनेक भाविकांनी कळसाचे दर्शन घेऊन निघून जाणे पसंत केले. गुरुवार व संक्रात असल्याने ग्रामीण भागातील तसेच शिर्डी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी आलेले होते. भाविकांच्या गर्दीने शिर्डी फुलून गेली होती.
( १४ शिर्डी गर्दी )