श्रीरामपूर/शेवगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करतानाच राज्य तोडण्याची इच्छा बाळगून असणाऱ्यांच्या हाती सत्ता देणार का, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या श्रीरामपूर व शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील सभेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदी सरकारच्या काळात ऊस, कापूस, डाळिंब, कांद्याच्या भावात घसरण झाली. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखविणाऱ्या मोदींचे हेच का अच्छे दिन आहेत? महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियानातून स्वच्छतेचे महत्त्व देशाला समजावून सांगितले. आता तेच मोदी स्वच्छ भारतचा नारा देऊन मार्केटिंग करुन छुपा अजेंडा राबवित आहेत. मार्केटिंगच्या माध्यमातून देशाची दिशाभूल करीत आहेत. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी अखंड महाराष्ट्रासाठी संघर्ष केला. पण आज मोदींना देशाच्या पंतप्रधान पदावर बसविणारेच महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. राज्याचे तुकडे पाडायचा विचार ही मंडळी करीत आहेत. महाराष्ट्र तोडणारांच्या हाती राज्य देणार का? राष्ट्रवादीचे सरकार आल्यास आमचे निर्णय दिल्लीतून नाही तर मुंबईतच होतील. शेतीचे, पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी, गतिमान, पारदर्शक, लोकाभिमुख व दर्जेदार काम करणारे सरकार आणण्यासाठी राष्ट्रवादीला मते द्या. आपण उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना वैयक्तिक स्वार्थासाठी काही केले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेवर आल्यास पहिल्या १०० दिवसात टोलमुक्त महाराष्ट्र करून एल. बी. टी. प्रश्न सोडवून दाखवू, असे सांगत अहमदनगर जिल्ह्यात आमदार चंद्रशेखर घुले व शंकरराव गडाख सोडल्यास पक्षाने सर्व नवी टीम मैदानात उतरविल्याचे पवार म्हणाले. बोधेगावच्या सभेत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी आमदार नरेंद्र घुले यांची भाषणे झाली. श्रीरामपूरच्या सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, घनश्याम शेलार, उमेदवार गायकवाड यांची भाषणे झाली. या सभांना उमेदवार आ.चंद्रशेखर घुले, उमेदवार सुनीता गायकवाड व शिर्डीचे उमेदवार शेखर बोऱ्हाडे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मोदींकडून देशाची दिशाभूल
By admin | Updated: October 6, 2014 23:56 IST