केडगाव : नगर तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ११० गावांपैकी ६५ गावांत कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर ४५ गावे आजही कोरोनामुक्त आहेत. सद्य:स्थितीत २०२ सक्रिय रुग्ण असून, आजपर्यंत ४०२ जणांचा मृत्यू झाला आहे. १६ हजार ३९४ कोरोनाबाधित आढळले असून, मृत्यूदर २.४८ टक्के एवढा आहे.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, तालुका आरोग्य अधिकारी ज्योती मांडगे, पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी एकत्रित प्रयत्न करून तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, सार्वजनिक कार्यक्रम, विवाह, दशक्रिया विधी यासारख्या कार्यक्रमांत लोकांची गर्दी वाढतच आहे. नागरिकांकडून कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. तालुक्यात देवगाव, टाकळी काझी, टाकळी खातगाव, जेऊर या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे.
----
आरोग्य केंद्रांतर्गत सक्रिय रुग्णसंख्या
मेहकरी-९, देवगाव-४७, जेऊर-२५, चास-२७, टाकळी काझी- ३३, वाळकी-९, देहरे-१०, रुईछत्तिसी- १३, टाकळी खातगाव- २९. (एकूण सक्रिय २०२)
----
आजपर्यंत बाधित, मृत्यू संख्या
मेहकरी- १३२१ (मृत्यू २६), देवगाव २०१० (मृत्यू १४), जेऊर २५५३ (मृत्यू १०६), चास १९३४ (मृत्यू ४४), टाकळी काझी २००७ (मृत्यू ९२), वाळकी १५९७ (मृत्यू ३२), देहरे १९७५ (मृत्यू ३१), रुईछत्तिसी ११०० (मृत्यू २१), टाकळी खातगाव १८९७ (मृत्यू ३६). एकूण बाधित १६,३९४, तर मृत्यू ४०२.
----
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पथके तयार केली आहेत. ज्या गावांनी काळजी घेतली तेथे रुग्ण आढळून येत नाहीत. नागरिकांनी सुरक्षित राहावे, विनाकारण घराबाहेर पडू नये. हलगर्जीपणा करता कामा नये. कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. प्रशासनाला सहकार्य करावे.
-उमेश पाटील,
तहसीलदार, नगर
---
कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यास सर्वच प्रशासकीय यंत्रणेवर ताण वाढत असून, मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे सर्व नागरिकांनी आपली व कुटुंबीयांची काळजी घेणे गरजेचे आहे. गावामध्ये ग्रामस्थांकडून शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
-ज्योती मांडगे,
तालुका आरोग्य अधिकारी, नगर