लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : गेल्या दीड वर्षापासून कोरोना या संसर्गजन्य आजाराने सर्वत्र थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचा थेट परिणाम आरोग्य यंत्रणेबरोबरच रुग्णांना विविध शारीरिक व्याधीच्या शस्त्रक्रिया करताना अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यावर नेमक्या शस्त्रक्रिया करायच्या कधी, असा प्रश्न सध्या अनेकांसमोर उभा ठाकला आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरोनामुक्तीच्या १४ दिवसानंतर ते दीड महिन्याच्या कालावधीत विविध तपासण्या करून शस्त्रक्रिया करता येऊ शकतात.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत मोठा कहर झाला. आता तिसऱ्या लाटेचा तज्ज्ञांकडून अंदाज वर्तविला जात आहे. दैनंदिन उपचारासाठी शस्त्रक्रियेसाठी असणाऱ्या सर्वच रुग्णालयांत कोरोनाचे उपचार सुरु झाले. त्यातच विविध शस्त्रक्रिया करावयाच्या असलेल्या अनेकांना कोरोनाने ग्रासले. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना संभ्रम निर्माण होऊ लागल्याने वेदनाही वाढत आहे. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया होऊ शकतात.
---------------
कोपरगाव तालुक्यातील कोरोनाचे एकूण रूग्ण - १४,०४०
बरे झालेले रूग्ण - १३,६४३
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण - १८०
कोरोनाचे बळी - २१७
-----------
दीड महिना वाट पहा
कोरोना होऊन गेलेल्या रुग्णाची कोणतीही शस्त्रक्रिया दीड महिन्याचा कालावधी होऊन गेल्यावर करता येते. याउलट कुठलीही तातडीची शस्त्रक्रिया ही बाधित झाल्यानंतर १४ दिवसांनी आरटीपीसीआर तपासणी करून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करता येते.
........
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रियांमध्ये ॲन्जिओग्राफी, आतड्याला पीळ पडणे, अपघातादरम्यान झालेली गंभीर दुखापत, किडनी, मेंदूविकार यांचा समावेश होतो. मात्र, कोरोना काळातही डॉक्टर पीपीई किट घालून रुग्णावर शस्त्रक्रिया करू शकतात. शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचे पालन केल्यास निश्चित आराम मिळू शकतो.
-------
नियोजित शस्त्रक्रिया
या शस्त्रक्रियांमध्ये मोतीबिंदू, हर्निया, टाॅन्सिल्स, अपेंडिक्स, मणक्याची शस्त्रक्रिया, नाक, कान, दातांच्या तसेच महिलांच्या गर्भपिशवी, कुटुंब नियोजन यासह इतरही छोट्या-मोठ्या शस्त्रक्रियांचा समावेश होतो. या शस्त्रक्रिया करताना बाधित झाल्याच्या दीड महिन्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक तपासण्या करून शस्त्रक्रिया करता येतात.
.............
नियोजित असो वा तातडीची शस्त्रक्रिया ती करताना रुग्णाला सर्दी, खोकला असता कामा नये. कारण या शस्त्रक्रिया टाके घालून केल्या जातात. त्यामुळे सर्दी, खोकला असल्यास टाके तुटण्याची भीती असते. मात्र, त्यावर नियंत्रण मिळवून शस्त्रक्रिया करता येते. तसेच कोरोनाबाधित झाल्यानंतर १४ दिवसानंतर तातडीच्या शस्त्रक्रिया आवश्यक तपासण्या करून करता येतात. तसेच दीड महिन्यानंतर प्लान शस्त्रक्रिया करता येतात. त्यामुळे शस्त्रक्रिया करण्यासाठी थांबून असलेल्या रुग्णांनी शस्त्रक्रिया करून घेण्यास हरकत नाही. मात्र, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.
- डॉ. कृष्णा फुलसौदर, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव