केडगाव : नगर तालुक्यातील जेऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या १६ गावांमध्ये कोरोना रूग्णांचे प्रमाण वाढत असून परिसरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये आजतागायत ४७१ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत ३४ जणांवर उपचार सुरू आहेत. येथे कोरोना मृत्यूदर ३.८२ तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.९५ इतके आहे. येथील मृत्यूदर हा चिंतेचा विषय बनलेला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात झाली असून आजपर्यंत १०१८ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांनी आजपर्यंत जेऊर ११९ (मृत्यू ६), इमामपूर ९ (मृत्यू १), बहिरवाडी १२ (मृत्यू १), धनगरवाडी २२ (मृत्यू १), पोखर्डी ६८ (मृत्यू ५), शेंडी ६५ (मृत्यू ०), पिंपळगाव माळवी ५५ ( मृत्यू २), डोंगरगण २८ ( मृत्यू ०), मांजरसुंबा ५ ( मृत्यू ०), पिंपळगाव उज्जैनी २३ (मृत्यू ०), ससेवाडी १३ (मृत्यू ०), मजले चिंचोली १८ ( मृत्यू १), खोसपुरी १५ ( मृत्यू १), आव्हाडवाडी ९ ( मृत्यू ०), उदरमल १० (मृत्यू ०), पांगरमल ० ( मृत्यू ०) अशा प्रमाणात कोरोना रुग्ण आढळलेले आहेत.
मागील पंधरा दिवसांपासून कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज कोरोना रूग्णांची तपासणी करण्यात येत आहे. तपासणीमध्ये साधारणतः दररोज १० ते २० रूग्ण नव्याने कोरोना बाधित सापडत आहेत. वाढत्या रूग्णांमुळे बाधितांना उपचारासाठी दाखल करण्यास जागा मिळत नाही. तसेच खासगी रूग्णालयात उपचार करणे परवडत नाही.
जेऊर परिसरातील गावांमध्ये वाढत्या कोरोना रूग्णांची संख्या पाहता येथे कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.