अकोले : जिल्हा वार्षिक नियोजनातून वनपर्यटन विकासांतर्गत पेठेचीवाडी ते खोडकेवाडी दरम्यानच्या ओढ्यावर साकारलेल्या लोखंडी साकव (पूल) व पर्यटक विश्रांती गृहाचे (डॉरमेटरी हॉल) लोकार्पण रविवारी आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या हस्ते करण्यात आले.
हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी पाचनई गाव शिवारातील पेठेचीवाडी ते खोडकेवाडी दरम्यानच्या ओढ्याला पावसाळ्यात पूर येतो. पुरातून कसरतीने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे छायाचित्रण सोशल मीडियावर गतवर्षी व्हायरल झाले होते. ही बाब लक्षात घेऊन आमदार डाॅ. लहामटे यांनी तातडीने पाठपुरावा करत लोखंडी साकव (पूल) तयार केला आहे.
तसेच वन पर्यटन विकास निधीतून पर्यटकांसाठी सुविधायुक्त सुसज्ज डाॅरमेटरी हाॅल बांधण्यात आला आहे. हा हॉल शुद्ध पिण्याचे पाणी, स्नानगृह, शौचालय आदींसह परिपूर्ण सुविधांसह सुसज्ज आहे. साकव व हाॅलचे लोकार्पण करताना स्थानिक रहिवासी व पर्यटक यांचे हित जपता आले, याचे मनस्वी समाधान असल्याचे आमदार डाॅ. लहामटे यावेळी म्हणाले. याप्रसंगी वन्यजीवचे वनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे, वनपरिक्षेत्रपाल डी. डी. पडवळे, वनपरिक्षेत्रपाल अमोल आडे तसेच पाचनईच्या सरपंच पार्वताबाई घोगरे, चंदर भारमल, बारकू भारमल, बुधा गावंडे, देवराम गावंडे आदी उपस्थित होते.
सोबत फोटो