कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कोविड रुग्णालयात रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्याखेरीज कुणालाही जाण्याची परवानगी नाही. ९ मे रोजी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सचिन चौगुले व साईसंस्थानचे विद्युत विभागाचे कर्मचारी अरुण जाधव यांनी साईबाबा रुग्णालयातील कोविड वाॅर्डात कोणाचीही परवानगी न घेता, पीपीई कीट परिधान न करता प्रवेश केला. उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेतली. फिर्यादीवरून सचिन चौगुले, अरुण जाधव यांच्यावर साथरोग अधिनियम, आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार लोखंडे यांनी माहिती दिली.
........................
रुग्णालयातील गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने आपल्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे. एका नातेवाईकाला त्रास होत असल्याने रुग्णालयात गेलो होतो. तेथील व्यवस्था घाम फोडणारी होती. त्याकडे सीईओ बगाटे यांचे लक्ष वेधले. त्यांच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. सोशल मीडियातून गलथान कारभार चव्हाट्यावर आणल्याने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी संस्थानच्या कोविड सेंटरची मंत्री, खासदार, आमदार अनेक अधिकाऱ्यांनी पाहणी केली. रुग्णांचे नातेवाईक कीटशिवाय तेथे राहतात, त्यांच्यावर बगाटे गुन्हे दाखल करणार का? स्वत: त्यांनीही कीट न घालता पाहणी केली. त्यांच्यासाठी कायदा नाही का? त्यांची वरिष्ठ पातळीवर तक्रार करणार आहे.
- सचिन चौगुले, शहराध्यक्ष, काँग्रेस.