गळनिंब येथे ४५ वर्षावरील नागरिकांसाठी दुसऱ्या डोसचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी लसीकरणाची सुरुवात होताच आधार कार्ड जमा करून नाव नोंदणी करण्यात आली. सरपंच शिवाजी चिंधे हे त्या ठिकाणी उपस्थित होते. टोकन पद्धतीने लसीकरण सुरू करण्यात आले. ६५ ते ७० नागरिकांचा दुसरा डोस शिस्तबद्ध पार पडला. त्यानंतर ४५ वर्षाच्या आतील काही नागरिकांनी पहिला डोस मिळण्यासाठी अरेरावी करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे लसीकरण काही काळ बंद करावे लागले. डाॅक्टर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना दोन तास गोंधळातच बसून राहावे लागले. वैद्यकीय अधिकारी डॉ. देवीदास चोखर यांनी दुसरा डोस झाल्यानंतर लस शिल्लक राहिली तरच ती तरुणांना दिली जाईल, असे स्पष्ट केले. मात्र तरीही गोंधळ सुरूच राहिला. त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजी पसरली आहे. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कडीत खुर्द, कडीत बुद्रुक, मांडवे, फत्त्याबाद, कुरणपूर, गळनिंब, उक्कलगाव, एकलहरे, नरसाळी, बेलापूर खूर्द, बेलापूर, ऐनतपूर गावांचा समावेश आहे.
-------