अहिल्यानगर : महाराष्ट्र शासनाने राज्य सामाईक परीक्षा सेल, मुंबई यांच्याकडून रविवारी सकाळच्या सत्रात एमएच-सीईटी ही पीसीएम ग्रुपसाठी परीक्षा घेण्यात आली. यामध्ये गणिताच्या पेपरमध्ये ५० पैकी २० ते २५ प्रश्नांचे पर्याय चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे असूने, किती गुण मिळणार? याची चिंता त्यांना लागली आहे.
अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी शासनाने नियुक्त केलेल्या एजन्सीमार्फत रविवारी जिल्ह्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात आली. यात फिजिक्स (५० गुण), केमिस्ट्री (५० गुण) आणि मॅथ (१०० गुण) असे दोनशे गुणांचे तीन पेपर होते. गणिताचा पेपर ५० प्रश्न व १०० गुणांचा होता. काही प्रश्नांचे चारही पर्याय चुकीचे असल्याचे विद्यार्थ्यांना आढळले. मात्र त्यावर क्लिक केल्याशिवाय पर्याय नव्हता. परीक्षा झाल्यानंतर पालकांनी परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांशी चर्चा केली. मात्र, याबाबत कोणतीही तक्रार स्वीकारू शकत नाही किंवा कार्यवाही करता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पालकांनी ‘लोकमत’मध्ये धाव घेत याबाबत आपली कैफियत मांडली.
सॉफ्टवेअरमधील गोंधळ
संगमनेर येथील परीक्षा केंद्रावरील विद्यार्थी व पालकांनी तेथील पर्यवेक्षकांना याबाबत विचारणा केली. चुकीचे पर्याय देण्याची चूक ही सॉफ्टवेअरमधील टेक्निकल एरर असू शकतो. पालकांनी सीईटी सेलकडे तक्रार करावी. यातून निश्चित तोडगा निघेल. कदाचित विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागू शकते, असे संबंधित पर्यवेक्षकांनी सांगितले.
ऑनलाइन पेपर सोडविताना चुकीचे पर्याय बघून धाकधूक वाढली होती. पुढे काही सुचत नव्हते. याबाबत कोणाला विचारण्याची सोय नव्हती. मात्र, प्रत्येक प्रश्नाखाली दिलेल्या चारपैकी चुकीचा असला तरी एका पर्यायावर क्लिक करावेच लागले. २० ते २५ प्रश्नांखाली चुकीचे पर्याय दिलेले होते.
आर्या काळे, अनुजा कदम, विद्यार्थी
सीईटीच्या गणिताच्या पेपरमध्ये चुकीचे पर्याय असल्याचे अनेक पालकांचे फोन आले. आज महाराष्ट्रात जवळपास ३० हजारांच्यावर विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात ही परीक्षा दिली. एका सत्रात झालेल्या परीक्षेतच हा गोंधळ दिसून आला.
प्रा. सच्चिदानंद घोणसे, खासगी क्लासेसचे संचालक