अहमदनगर : महापालिकेच्या तोफखाना येथील लसीकरण केंद्रावर मंगळवारी प्रचंड गोंधळ झाला. तीन महिने उलटूनही कोविशिल्डचा दुसरा डोस मिळत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, आयुक्त शंकर गोरे यांनी लसीकरण केंद्राला भेट देऊन शांततेचे आवाहन केले.
महापालिकेने प्रत्येक लसीकरण केंद्रावर कोविशिल्डचे २०० डोस उपलब्ध होणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. त्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी भल्या सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या; परंतु ऐनवेळी १७० डोस उपलब्ध झाले. तोफखाना लसीकरण केंद्रावर नागरिकांची दुसरा डोस घेण्यासाठी रांग लावली होती. दुसरा डोस घेण्याबाबत अनेकांना मेसेज होते, म्हणून त्यांनी लसीकरण केंद्रावर गर्दी केली. तरीही लस न मिळाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत आरोग्य कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. दरम्यान, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे यांनी तोफखाना आरोग्य केंद्राला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली. कोविशिल्ड लस आठ दिवसांनंतर आली होती.
मुुकुंदनगर येथील लसीकरण केंद्रावरही गदारोळ झाला. यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांनी शांततेचे आवाहन केले. माळीवाडा येथील महात्मा फुले लसीकरण केंद्रावरही प्रचंड गर्दी होती. नागापूर येथील लसीकरण केंद्राबाहेरही नागरिकांनी रांगा लावल्या होत्या; परंतु त्या प्रमाणात लस उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला.
.....
एकूण लसीकरण
१ लाख २७ हजार ९१४
कोविशिल्ड
पहिला डोस- ५६ हजार १४४
दुसरा डोस- २३ हजार ९४०
.....
कोव्हॅक्सिन
पहिला डोस- २४ हजार ७४०
दुसरा डोस- १६ हजार ८६८
....
तीन महिने उलटूनही दुसरा डोस मिळेना
कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर ८४ दिवसांनी दुसरा डोस घेणे आवश्यक आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेऊन तीन महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला; मात्र दुसरा डोस मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून, लस मिळत नसल्याने प्रशासनाचाही नाइलाज झाला आहे.
..
आमच्यासह अनेक जण सकाळी पाच वाजल्यापासून केंद्राबाहेर थांबलो होतो. रांगेत असलेल्यांची यादी करून ती अधिकाऱ्यांना दिली; मात्र अचानक ती यादी रद्द केली आणि पहिल्यांदा डोस घेणाऱ्यांना हाकलून दिले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. रांगेत अनेक जण उभे होते, तरीही थेट आतमध्ये जावून अनेक जण लस घेत असल्याचे दिसले. केंद्रावर कोणतेही नियोजन नसल्याचे दिसले.
-किरण सुपेकर, अभिजित विधाते (नागरिक)
----------
जे आधी रांगेत उभे होते, त्यांना आज लस मिळाली नसली तरी त्यांना उद्या, परवाचे टोकण देणे आवश्यक होते. आज ज्यांची यादी करण्यात आली होती, त्यांनाही लस मिळणे आवश्यकच आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची आणि ज्येष्ठांची वेगळी रांग करावी. महापालिकेने मंगल कार्यालयात लसीकरणाची व्यवस्था करावी. पाऊस आला असता तर तोफखाना केंद्रावर मोठा गोंधळ झाला असता.
-धनंजय जाधव, माजी नगरसेवक.
------------
सूचना : २७ महापालिका
महापालिकेच्या तोफखाना केंद्रावर लस मिळत नसल्याने नागरिकांनी गर्दी केली होती.