अकोले : येथील अकोले महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञानच्या वनस्पतीशास्त्र विषयाच्या परीक्षेत मुलांना चालू अभ्यासक्रमाऐवजी मागील पॅटर्नची प्रश्नपत्रिका वाटप झाल्याने मोठा गोंधळ उडाला. याबाबत संस्थेने परीक्षा विभागाकडे खुलासा मागितला आहे. महाविद्यालयातील वरिष्ठ वर्गांच्या वार्षिक परीक्षा नुकत्याच झाल्या. वनस्पती शास्ञाचा पहिला पेपर सुरू असताना ब्लॉक क्रमांक १४ मधील २४ नियमित विद्यार्थ्यांना जुन्या २००८च्या पॅटर्न नुसार प्रश्नपत्रिका देण्यात आल्या. मुलांच्या ही बाब उशिराने लक्षात आली. केलेला अभ्यास व वेगळे असलेले प्रश्न यामुळे गोंधळलेल्या विद्यार्थ्यांनी तोडकी मोडकी उत्तरे लिहिली. वनस्पतीशास्त्राच्या प्राध्यापकांनी २०० उत्तरपञिका तपासल्या असून, त्यात जुन्या पॅटर्ननुसार एका विद्यार्थ्याची उत्तरपञिकाही तपासली आहे. आता २४ उत्तरपञिका कशा तपासायच्या? हा प्रश्न पडला असून संबंधीत विषयाचे प्रा. बी. के. भांगरे यांनी प्राचार्यांकडे याबाबत लेखी मार्गदर्शन मिळावे अशी मागणी केली आहे. परीक्षेत झालेल्या प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी प्राध्यापकांच्या ‘पुक्टो’ संघटनेने शिक्षण संस्थेकडे केली आहे. दरम्यान संबंधित प्रकरणाला कॉलेजअंतर्गत कुरघोड्यांचा दर्प असल्याचे बोलले जात आहे. संस्थेने या प्रकरणाची दखल घेतल्याचे समजते. (तालुका प्रतिनिधी)
चुकीची प्रश्नपत्रिका आल्याने गोंधळ
By admin | Updated: August 23, 2023 13:16 IST