शेवगाव : कोणत्याही कामाच्या दर्जाबाबत तडजोड करू नये, कामातील दिरंगाई कमी करून लोकाभिमुख कामांना विशेष प्राधान्य द्या. कामे निर्धारित वेळेतच पूर्ण करा, अशा सूचना शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांनी दिल्या.
सोमवारी (दि.१९) दहीगावने गटातील ग्रामपंचायतींचे ग्रामविकास अधिकारी- पदाधिकारी आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची समन्वय सभा पंचायत समितीच्या लोकनेते मारुतराव घुले पाटील सभागृहात घेण्यात आली. यावेळी पंचायत समिती सदस्य मंगेश थोरात, गटविकास अधिकारी शेखर शेलार, गटविस्तार अधिकारी बाळासाहेब कासार, गटशिक्षणाधिकारी रामनाथ कराड, विस्तार अधिकारी मल्हारी इसरवाडे, संजय जगताप, शैलजा राऊळ, कृषी विस्तार अधिकारी रामकिसन जाधव, शाखा अभियंता रावसाहेब साळवे, दहीगावने गटातील सरपंच सुभाष पवार, आबासाहेब काळे, संतोष चव्हाण, काकासाहेब काळे, अण्णासाहेब जगधने, शरद सोनवणे, गोकुळ भागवत, संतोष धस, जालिंदर काळे, शफिक सय्यद आदी उपस्थित होते. सभेत विविध विषयांवर चर्चा करीत सभापतींनी अधिकाऱ्यांना कामांबाबत सूचना केल्या. विविध विकासकामांचे अंदाजपत्रक तयार करणे, टेंडर करणे, अपूर्ण कामे व नवीन कामे मुदतीत पूर्ण करणे करण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत सर्व समस्या व शंकांचे निरसन सर्वांच्या समक्ष होत असल्याने, गावातील विकासाचे प्रश्न मार्गी लागतील, अशा भावना सरपंच शफीक शेख, संतोष धस, शरद सोनवणे यांनी व्यक्त केल्या.
...................
कोरोनाकाळात रखडलेल्या विकासकामांना गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या अधिकारी, पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय असायला हवा. ग्रामपंचायतींच्या विकासकामांसंदर्भातील अडचणी, प्रश्न थेट समजून घेण्यासाठी व ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषद गटाप्रमाणे स्वतंत्र सभा मार्गदर्शक ठरतील.
-डॉ. क्षितिज घुले, सभापती, पंचायत समिती.
..................
पुढील बैठकांचे नियोजन
आगामी २२ तारखेला भातकुडगाव, २३ तारखेला लाडजळगाव तर २६ रोजी बोधेगाव गटाची बैठक आयोजित केली असल्याचे कनिष्ठ सहायक प्रभाकर गटकळ यांनी सांगितले. या बैठकांमध्ये त्या-त्या भागातील विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.