अहमदनगर : बोगस डॉक्टरांचा शोध घेणाऱ्या तालुकास्तरावरील समित्या सध्या कागदावरच असून ‘मुुन्नाभाई’ शोधण्याकडे त्यांचा कानाडोळा होत आहे. तक्रार आली तरच कधीतरी कारवाई केली जाते. अन्यथा या समित्या थंड बस्त्यात पडून आहेत. गेल्या वर्षभरात या समित्यांकडून ठोस कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी तालुकास्तरावर गटविकास अधिकारी व आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कोणी बोगस डाॅक्टर रुग्णांवर उपचार करून रुग्णांचा जीव धोक्यात आणत असेल, तर अशा बोगस डाॅक्टरांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात तालुकास्तरावर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेक ठिकाणी चुकीचे उपचार झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. एमबीबीएस किंवा एमडी डाॅक्टरांनी करावयाचे उपचार बीएचएमएस किंवा बीएएमएस डाॅक्टर करतात किंवा कोणतीही पदवी नसतानाही काही डाॅक्टर उपचार करताना आढळतात. अशावेळी स्वत:हून आपल्या अधिकार क्षेत्रात भेटी देऊन तपासणी करण्याचे काम समितीने करणे अपेक्षित असते, परंतु तक्रार आल्याशिवाय कारवाई होत नसल्याचेच आकडेवारीवरून समोर आले आहे. सध्या तरी गेल्या वर्षभरात कोणतीही ठोस कारवाई झाल्याचे समोर आलेले नाही.
--------------
अधिकृत हाॅस्पिटलची माहितीच नाही
जिल्ह्यात किती अधिकृत हाॅस्पिटल (रजिस्टर) आहेत, याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडे असते, परंतु ही माहिती संबंधितांकडून मिळू शकली नाही.