तिसगाव : पाथर्डी तालुक्यातील तिसगावसह पश्चिम भागातील सव्वीस गावांच्या परिसरात सोळा दिवसांपासून पाऊस रुसला आहे. दिवसा ढगाळ वातावरण, रात्री वारे, निरभ्र चांदणे असे विषम वातावरण आहे. त्यामुळे खरिपातील कपाशी, बाजरी, तूर, भुईमूग पिकांची वाढ खुंटली आहे.
अशा वातावरणामुळे पिकांवर रोग, किडींचा प्रादुर्भावही होत आहे.
शेतकरी भगवान मरकड म्हणाले, डाळिंबावर तेल्याचे अस्मानी संकट कोसळल्याने गर्भगिरी पट्ट्यात उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. या वर्षी ६ जूनलाच पावसाचे आगमन झाले. कमी-अधिक दिवसांच्या अंतराने नऊ वेळेस पाऊस कमी-अधिक बरसला. गत महिन्यातील १८ जुलै अखेर एकूण २५४ मिलीमीटर पाऊस झाला. त्यानंतर पंधरवडा उलटला. नक्षत्रेही बदलली. पाऊस मात्र आला नाही. असे वास्तव चित्र परिसरात प्रथमच अनुभवास येत असल्याने बळीराजा हबकून गेला आहे.
सुसरे, सोमठाणे गाव परिसर तूर, कपाशीचे आगर म्हणून ओळखले जाते. पाऊस, अनुकूल हवामान नसल्याने कपाशी, तूर पीक केवळ वीतभर वाढले आहे. फळशेतीचा बहर फुलण्यासाठी पाऊस गरजेचा असल्याची खंत नवनाथ जगताप यांनी व्यक्त केली.
जवखेडे, आडगाव, कोपरे या बागायती पट्ट्यांत ऊस लागवडीखालील क्षेत्रालाही मोठ्या पावसाची आस लागली आहे. खरीप पिकांनी माना टाकल्यात, असे अमोल गवळी, पोपटराव कराळे म्हणाले.
दिवस - रात्रीच्या विषम हवामानाने शेतीपिके व उत्पादकांचा पुरता बेरंग झाला आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतित आहे.