लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे सर्दी, खोकला यासह थंडी, तापाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. यातील काही रुग्णांना डेंग्यू, चिकुनगुनिया, फ्लू, मलेरियाची लागण झाली असल्याचेही आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र, कोरोनाबाधित येणाऱ्या रुग्णाचा आकडा स्थिर असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
कोपरगाव तालुक्यात ७९ गावांसह शहराचा समावेश आहे. शहरी भागातील सुमारे ७५ हजारपेक्षा जास्त लोकसंख्येसाठी कोपरगाव नगरपरिषदेचा सरकारी दवाखाना तसेच ग्रामीण रुग्णालयात नागिरकांना उपचार घेता येतो, तर तालुक्यातील ग्रामीण भागातील सुमारे २ लाख ३२ हजार लोकसंख्येसाठी जिल्हा परिषदेची ६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३१ उपकेंद्रांमार्फत उपचार केला जातो. त्यातच शहरातील व तालुक्यातील खासगी दवाखान्यांची संख्या वेगळीच आहे. या सर्वच दवाखान्यांत दररोज उपचारासाठी १०० पेक्षा अधिक रुग्ण येत आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्यात उपचार घेणाऱ्यांची संख्या हजाराच्या पटीत आहे.
सद्य:स्थितीत तालुक्यात सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. यामध्ये सर्दी, खोकला, थंडीताप, अंगदुखी अशा लक्षणांची रुग्ण आढळून येत आहे. त्यामळे सर्वच शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांची रीघ लागली आहे. या सर्व प्रकारात सरकारी रुग्णालयांच्यामार्फत लसीकरण व कोरोना रुग्ण तपासणीची मोहीम मोठ्या संख्येने सुरू आहे. मात्र, आधीच अपुरा कर्मचारी वर्ग, त्यात कोरोनाची कामे यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांबरोबरच साथीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांची चांगलीच फरपट होत आहे.
............
तालुक्यातील शासकीय दवाखाने
* कोपरगाव ग्रामीण रुग्णालय - १
* नगरपरिषद प्राथमिक आरोग्य केंद्र - १
* जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्रे - ६
* आरोग्य उपकेंद्रे - ३१
---------------------
सध्या तालुक्यात सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. सततच्या पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याचे साचलेले डबके, तुंबलेल्या गटारी यातून डासांची उत्पत्ती होऊन ते चावल्याने फ्लू, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया ही लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुका स्तराहून आरोग्य केंद्रांना सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, सद्य:परिस्थितीत अपुरा कर्मचारी वर्ग, त्यातच सुरू असलेले लसीकरण व कोरोना तपासणीचे मोठे काम सुरू आहे. त्यासाठी या संदर्भातील उपाययोजना करण्यासाठी सामजिक गरज म्हणून ज्या त्या गावातील, भागातील तरुण, सामाजिक संघटना यांनी पुढाकार घेऊन आरोग्य यंत्रणेला मदत केल्यास निश्चित यावर नियत्रंण मिळविता येईल.
- डॉ. विकास घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी, कोपरगाव
.............