सत्तार शेख । हळगाव : दावण्या, करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे नान्नज परिसरातील द्राक्ष बागा सोडून देण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. यामध्ये शेतक-यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रोगामुळे नुकसानग्रस्त झालेल्या द्राक्ष बागांचे तातडीने पंचनामे करून नुुकसान भरपाई तातडीने देण्याची मागणी शेतक-यांनी केली आहे.नान्नज येथे जवळपास ४५ हेक्टर द्राक्ष लागवड झालेली आहे. जामखेड तालुक्यात नान्नज परिसरात सर्वाधिक द्राक्ष लागवड आहे. याशिवाय हळगाव, पोतेवाडी येथेही अल्प प्रमाणात द्राक्ष लागवड झालेली आहे. मागील वर्षीच्या भीषण दुष्काळात शेतक-यांनी टॅँकरच्या पाण्यावर द्राक्ष बागा जगविल्या आहेत. परतीचा पाऊस झाला. मात्र त्याने द्राक्षाचे मोठे नुकसान केले. नान्नज येथील मोहळकरवस्ती व उरेवस्ती या भागातील द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागाने संयुक्त पंचनामे केले. मात्र भरपाई मिळालेली नाही. दरम्यान, नान्नज भागातील द्राक्ष बागांवर दावण्या, करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. बुरशीजन्य रोगाबरोबरच कळी गळीचाही सामना करावा लागत आहे. कळीच्या स्थितीमध्ये करपा आणि फुलो-याच्या अवस्थेत प्रामुख्याने दावण्या रोगाला बळी पडत आहेत. करप्याने कोवळी फूट, कोवळे घड करपून जाऊ लागले आहेत. दावण्याच्या प्रादुर्भावाने फुलोºयातील घड तत्काळ कुजू लागले आहेत. यामुळे यंदा उत्पादनात मोठी घट होणार आहे. द्राक्ष बागांवर झालेला भरमसाठ खर्च अन् मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत राहिल. दावण्या व करपा रोगामुळे नान्नज येथील रामभाऊ मारूती मोहळकर (दोन एकर), दत्तु श्रीपती मोहळकर, गोरख निवृत्ती मोहळकर, श्रीमंत महादेव पोते (पोतेवाडी), भाऊराव विठोबा मोहळकर, दत्तु सोनबा मोहळकर (प्रत्येकी एक एकर), गोरख सोपान मोहळकर (पाऊण एकर), सुभाष किसन मोहळकर (अर्धा एकर) आदी शेतक-यांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले होते. त्याची नुकसानीची भरपाई अजूनही मिळालेली नाही. त्यातच आता द्राक्ष बागा दावण्या व करपा रोगाला बळी पडल्या आहेत. माझ्यासह अनेक शेतक-यांना यंंदा बागा सोडून देण्याची वेळ आली आहे. यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे, असे नान्नज द्राक्ष उत्पादक दिलीप मोहळकर यांनी सांगितले.
दावण्या, करपा रोगाने द्राक्ष उत्पादक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 16:27 IST