पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पोखर्डी येथील गावातील युवकांसाठी काहीतरी विधायक कार्य करण्याच्या उद्देशातून स्थापता अभियंत्याने दहा वर्षांपूर्वी एक सार्वजनिक वाचनालय उभे करण्याचे स्वप्न पाहिले होते. अथक प्रयत्नातून विविध संस्था, दानशूर व्यक्तींची मदत घेत एक लाख ग्रंथांचे सार्वजनिक वाचनालय उभे केले. यासाठी साडेतेरा लाखांचा खर्च झाला आहे.
अंतु पोपटराव वारूळे असे वाचनालय उभारणाऱ्या स्थापत्य अभियंत्याचे नाव आहे. त्यांनी पुणे, मुंबई, सिंगापूर आदी ठिकाणी नोकरी केली. परंतु, गावातील युवकांसाठी काहीतरी विधायक कार्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी दहा वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिले होते. ग्रामीण भागातील युवकांना अभ्यासासाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. ग्रामीण भागातील युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. परंतु, त्यांना योग्य सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे त्यांनी गावात एक सुसज्ज एक लाख ग्रंथांचे वाचनालय उभे करण्याचा निश्चय केला. या कामासाठी त्यांना माजी जि. प. अध्यक्षा शालिनी विखे यांनी जनसुविधा निधीतून सात लाख रुपयांचा निधी मंजूर केला. वारूळे यांनी स्वखर्चातून चार लाख रुपये निधी दिला. ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून दीड लाख व ग्रामनिधीतून चार लाख रुपये असे मंजूर करून घेतले.
पोखर्डी गावात साडेतेरा लाख रुपये खर्चाची अद्ययावत ग्रंथालय इमारत दिमाखात उभी राहिली आहे. या कामासाठी त्यांना पोखर्डी गावातील माजी सरपंच प्रवीण जावळे, रविराज निमसे, दत्तात्रय जाधव, गणेश धाडगे, राजेंद्र निमसे, प्रवीण राऊत, राहुल गिते आदींची मदत झाली. ग्रामस्थ वाढदिवस, विवाह यानिमित्त या ग्रंथालयास पुस्तके भेट देत आहेत. गावातील युवक ग्रंथालय सुविधेचा लाभ घेत असून स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.
--
०३ पोखर्डी
पोखर्डी येथे साडेतेरा लाख रुपये खर्चाचे सार्वजनिक वाचनालयाचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे.