अहमदनगर : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, शालेय विद्यार्थ्यांसह बहुसंख्य नगरकरांनी हातात झाडू घेत, अवघ्या अडीच ते तीन तासांत येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला स्वच्छ केला़ सोमवारी सकाळी सात ते दहा या वेळेत हे स्वच्छता अभियान राबविले गेले. शाळा, महाविद्यालये, प्रशासकीय कार्यालये, पोलीस, सामाजिक संस्थांसह विविध मित्रमंडळे अशा ५९ आस्थापनांमधील सुमारे सात हजार जणांनी या अभियानात भाग घेतला.‘नगरकरांच्या सहभागातून स्वच्छता’ ही संकल्पना घेत, जिल्हा प्रशासनाच्याकडून सोमवारी भुईकोट किल्ल्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या उपस्थितीत अभियानाला प्रारंभ झाला़ सकाळी सात वाजता हातात झाडू व टोपली घेऊन शालेय विद्यार्थी थेट भुईकोट किल्ल्यात दाखल झाले़ शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही हातात झाडू घेतला. घनदाट झाडींनी व्यापलेल्या भुईकोट किल्ल्यातील केरकचरा, गवत, प्लॅस्टिक, मोठे दगड काही मिनिटातच दिसेनासे झाले. सात हजार जणांच्या सहभागातून किल्ल्याचा साडेतीनशे ते चारशे एकरांचा परिसर पूर्णत: स्वच्छ झाला़ आठ ते दहा डंपर कचरा या वेळी काढण्यात आला़ अभियानात सहभागी झालेल्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते पुस्तके देऊन सत्कार झाला. (प्रतिनिधी)
नगरचा ‘भुईकोट’ झाला तीन तासांत चकाचक
By admin | Updated: February 22, 2017 04:10 IST