अहमदनगर : केडगाव हत्याकांडाच्या तपासाबाबत मृतांच्या कुटुंबीयांनी तपास यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने अखेर हा गुन्हा सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आला आहे़ बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना गुन्ह्याची कागदपत्रे सीआयडीच्या अपर पोलीस महासंचालकांकडे (पुणे) हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.केडगाव येथे महापालिका पोटनिवडणुकीच्या वादातून ७ एप्रिलला शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली होती़ घटनेला सव्वा महिना उलटूनही हत्याकांडाच्या तपासाला गती मिळत नसल्याचे सांगत कोतकर व ठुबे यांच्या कुटुंबीयांनी चार दिवस उपोषण केले़ या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली आहे़ भाजपाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप व संग्राम जगताप यांच्यासह ३० जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे़
नगरच्या शिवसैनिकांच्या हत्येचा तपास सीआयडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 06:04 IST