कर्जत : कोरोना तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर येथील उप जिल्हा रुग्णालयात लहान मुलांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आला आहे. त्या वाॅर्डमधील भिंतींवर छोटा भीम, रेल्वे, अंकगणित, हत्ती, जिराफ अशी चित्रे रेखाटून मुले हसती-खेळती रहावीत, असे नियोजन करण्यात आले आहे. वाॅर्डला शाळेचा लूक देऊन मनमोहक विलगीकरण कक्ष तयार केला आहे.
येथील आरोग्य विभागाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला आहे.
येथील आरोग्य विभागाने अपुरे अधिकारी, कर्मचारी यांच्या समस्येवर मात करत उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य प्रकारे वापर करत आशा सेवकांची मदत घेऊन कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना केला. कोणीही अतिरिक्त कामाचा ताण आहे, याची जाणीव होऊ दिली नाही. कोरोना काळामध्ये आरोग्य, महसूल व पोलीस प्रशासन यामध्ये चांगला समन्वय दिसून आला. त्यामुळे कोरोना टेस्टिंग, सर्व शासकीय नियमांचे पालन करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली. कोरोना रुग्णांसाठी कर्जत, गायकरवाडी, मिरजगाव, राशीन येथे विलगीकरण कक्षाचे नियोजन करण्यात आले होते. कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामध्ये लहान मुले बाधित होण्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात शालेय मुलांसाठी विलगीकरण कक्ष तयार केला आहे. मुलांना दवाखान्यात दाखल केल्यानंतर ते दडपणात राहू नयेत. ते खेळीमेळीच्या वातावरणात रहावेत यासाठी येथे बाराखडी, एबीसीडी, विविध प्राण्यांची चित्रे, कार्टून, सुविचार जसे शाळेत असते तसे विविध चित्र रेखाटण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे चित्र रेखाटणारे कलाकार कर्जत तालुक्यातीलच आहेत.
मुलांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शालेय अभ्यास, जनरल नॉलेजची माहिती दिली जाणार आहे. मुलांवर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांचीही नेमणूक केली जाणार आहे.
---
२१ कर्जत मुले१,२,३
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलांसाठी बनविलेल्या स्वतंत्र कक्षात रेखाटण्यात आलेली विविध चित्रे.