राहुरी : तनपुरे कारखान्याची निवडणूक बिनविरोधसाठी आपण अखेरपर्यंत प्रयत्न केले. परंतु त्यात यश आले नाही. आता त्यात अडथळा नको म्हणून आपण निवडणुकीतून माघार घेतली आहे. जे मंडळ निवडून येईल, त्याला कारखाना सुरू होण्यासाठी मदत करू, असे आमदार शिवाजी कर्डिले यांनी स्पष्ट केले. कर्डिले गटाच्या सर्व उमेदवारांनी अर्ज काढून घेतले. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कुणाचा प्रचार करणार या प्रश्नाला बगल देतांना कर्डिले म्हणाले, सर्व मंडळांपासून मी सुरक्षित अंतरातवर आहे़ राधाकृष्ण विखे यांचे मंडळ असो की प्रसाद तनपुरे, शिवाजीराव गाडे यांचे मंडळ असो कुणीही सत्तेवर आले तरी कारखाना सुरू करण्यासाठी मदत केली जाईल़ ऊस उत्पादक व कामगारांच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्याने आपण लोकप्रतिनिधी म्हणून केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करू ,असेही ते म्हणाले.निवडणूक बिनविरोध का होऊ शकली नाही, या प्रश्नाला उत्तर देताना कर्डिले म्हणाले, सर्व मंडळांच्या नेत्यांनी सकारात्मक दृष्टीने प्रयत्न केले़ मात्र सुजय विखे यांनी निवडणूक बिनविरोध होण्याच्या प्रयत्नाला खो घातला़ मी मतदार सोडून कुणालाही घाबरत नाही़ निवडणुकीच्या काळात माझ्यावर कुणीही टीका करणार नाही, असे कर्डिले यांनी सांगितले़ पत्रकार परिषदेस माजी आमदार चंद्रशेखर कदम, नानासाहेब गागरे, सुभाष गायकवाड, वैभव मुळे, विजय बनकर,चांगदेव भोंगळ आदी उपस्थित होते़‘साखर कारखानदारीत हे प्रथमच घडतेय’कारखान्याच्या इतिहासात कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्ती निवडणूक लढविते असे राज्यात कधी झाले नाही़ मात्र तनपुरे कारखान्यात विखे यांनी थेट निवडणुकीत मंडळ उभे करण्याचा निर्णय घेतला़ यापूर्वी राहुरी तालुक्यात विकास मंडळ किंवा जनसेवा मंडळाला आलटून पालटून मदत केली़ साखर कारखानदारीत असा प्रकार प्रथमच घडत असल्याचे कर्डिले यांनी निदर्शनास आणून दिले़
‘तनपुरे’तून कर्डिले यांची माघार
By admin | Updated: June 2, 2016 00:58 IST