अहमदनगर : सामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळावी म्हणूनच शिर्डी येथील साई संस्थानच्या कायद्यात बदल केला आहे. यापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेली यादी कुठून आली, याचा आता शोध घ्यावा लागेल, असे सांगत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘ती’ यादी म्हणजे माध्यमांचा कल्पनाविस्तार असल्याचे स्पष्ट केले.
अहमदनगरमध्ये शनिवारी पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, सर्वसामान्य कार्यकर्त्याला काम करण्याची हौस असते. तो चांगला वेळ देऊ शकतो. खूप मोठी माणसं घेतली तर त्यांना वेळ देता आला पाहिजे. सामान्य कार्यकर्त्यालाही साई संस्थान विश्वस्त मंडळावर नियुक्ती देता आली पाहिजे, यासाठी कायद्यात किरकोळ दुरुस्ती केली आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणजे सामान्य लोकप्रतिनिधीही असू शकेल. मात्र, समाजमाध्यमांत जी यादी जाहीर झाली होती, ती नावे कोठून आली, याचा मलाच आता शोध घ्यावा लागेल, असे सांगत त्यांनी सदरची यादी ही अंतिम नाही, असेच संकेत थोरात यांनी दिले आहेत. तसेच आता या यादीत कोण सामान्य कार्यकर्ते असतील, हे एक जुलैनंतरच स्पष्ट होणार आहे.