पाथर्डी : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी गुरुवारी तालुक्यातील खेर्डे प्राथमिक शाळेत शिक्षकाची भूमिका बजावली. हातात खडू घेत त्यांनी विद्यार्थ्याना गणिते सोडविण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी तेवढ्याच तत्परतेने अचूक उत्तरे दिल्याने नवाल अवाक् झाले व त्यांनी स्वत:चा पेन विद्यार्थ्यांना बक्षीस दिला. तसेच शाळेचा परिसर पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. नवाल खेर्डे येथे ग्रामसभेसाठी आले होते. त्यांच्यासमवेत गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, गटशिक्षणाणिकारी शिवाजी कराड, केंद्र प्रमुख आशा शिरसाट होते. ग्रामसभा संपल्यानंतर नवाल यांनी आपला मोर्चा जवळच असलेल्या प्राथमिक शाळेकडे वळविला. शाळेच्या प्रवेशव्दारावर आल्यानंतर परिसर पाहून त्यांनी ‘अतिशय छान, सुंदर’ असा अभिप्राय दिला. त्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधीत हातात खडू घेतला व विद्यार्थ्यांना गणिते सोडविण्यास दिली. विद्यार्थ्यांनीही तेवढ्याच समर्पकपणे प्रश्नांची अचूक उत्तरे दिल्याने नवाल अवाक झाले व त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून पेन दिला.खेर्डे प्राथमिक शाळेचा लोकसहभागातून विकास झाला असून शाळेचा परिसर अत्यंत सुंदर व रमणीय आहे.शाळेच्या भिंतीवर पाणी बचत, पर्यावरण, स्वच्छता, संस्कार तसेच आरोग्य याबाबत नाविन्यपूर्ण संकल्पनेतून संदेश साकारले आहेत. शाळेचे कामकाज व परिसर पाहून नवाल यांनी समाधान व्यक्त करुन अशाच प्रकारे लोकसहभागातून विकास केल्यास गावाचा कायापालट होईल, असे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी नवाल यांचे फुले देवून स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)
‘सीईओ’ बनले शिक्षक
By admin | Updated: April 22, 2016 00:11 IST