अहमदनगर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जामखेड व पाथर्डी या दोन्ही तालुक्यांच्या ठिकाणी वसतिगृह होणार आहे.
जामखेड व पाथर्डी येथे मुलांसाठी २ व मुलींसाठी २ याप्रमाणे प्रत्येकी १०० क्षमतेची एकूण ४ शासकीय वसतिगृहे शासनाने मंजूर केलेली आहेत. ही वसतिगृहे भाडेतत्त्वावरील इमारतीत सुरू करण्यासंदर्भात शासनस्तरावर मान्यता मिळालेली आहे. जामखेड व पाथर्डी तालुक्यात अशाप्रकारे इमारत भाडेतत्त्वावर उपलब्ध असेल, तर अशा इमारत मालकांनी सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालय, अभिविश्व कॉम्प्लेक्स, बोल्हेगाव फाटा, मनमाड रोड अहमदनगर, तसेच अधीक्षक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह आरोळेनगर (जामखेड) येथे आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.