अहमदनगर : जिल्ह्यात सध्या शनिवार व रविवारी पूर्णपणे दुकाने बंद करण्याचा आदेश आहे. त्यामुळे व्यापारपेठेचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शनिवार, रविवारी करण्यात आलेला दुकाने बंदचा आदेश मागे घेण्याची मागणी नगर शहरातील व्यापाऱ्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच निवेदन पाठविले आहे, अशी माहिती व्यापारी असोसिएशनने पत्रकात दिली आहे.
नगर येथील बाजारपेठेत किरकोळ दुकानांच्या मालकांची नोंदणीकृत संघटना व सराफ सुवर्णकार संघटना आहे. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, सकाळी ७ ते संध्याकाळी ४ ही वेळ ग्राहकांना आणि दुकानदारांना गैरसोयीची आहे. सकाळी ९ ते संध्याकाळी ६ किंवा सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत ही वेळ योग्य आहे.
सणवाराचा हंगाम नसल्याने सध्या दुकानात कुठेच गर्दी नसते. दुकानदारांमुळे कोरोना पसरतो, असे मुळीच नाही. तिसरी लाट कधी येईल याचा अंदाज टास्क फोर्स किंवा कोणालाही सांगता आलेला नाही. सध्याच्या स्थितीत कोरोनाची रुग्णसंख्या नियंत्रणाखाली आहे. शनिवार व रविवारी लॉकडाऊन दरम्यान लोक घरात राहत नाहीत. आठवड्याच्या शेवटी सर्व हिल स्टेशन आणि पिकनिक स्पॉट्सवर गर्दी आहे. दुकाने बंद असतानाही रस्त्यावर गर्दी असते. त्यामुळे दोन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्याचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे हे निर्बंध त्वरित उठवावेत. जिल्ह्यातील तालुका आणि ग्रामीण भागांच्या तुलनेत शहर भागात रुग्ण संख्या कमी आहे. म्हणून, लोकसंख्येची कोणतीही अट न घालता उर्वरित जिल्ह्यापासून शहर भाग स्वतंत्र करावा. लॉकडाऊन आणि प्रचंड महागाई या दोन्हींचा एकाचवेळी सामना लोक करू शकत नाहीत. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी लॉकडाऊन शिथिल करून गरिबांना मदत करावी, असे या निवेदनात म्हटले आहेत.
या निवेदनानर महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी किरण व्होरा, श्यामराव देडगावकर, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी सुभाष मुथा, नीळकंठ देशमुख, अखिल भारतीय लाड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष सुभाष कायगावकर यांच्या सह्या आहेत.