१८ नोव्हेंबर २०१९ रोजी आरोपी अजहर शेख व त्याच्या साथीदारांनी उद्योजक सय्यद अब्दुल करीम (हुंडेकरी) यांचे नगरमधून अपहरण केले होते. त्यानंतर आरोपींनी हुंडेकरी यांना औरंगाबाद, जालनामार्गे नांदेडला नेले. तेथे २५ लाख रुपये खंडणी मागून जीवे मारण्याची धमकी दिली. हुंडेकरी यांनी आरोपींना खंडणीची रक्कम देण्याचे कबूल केले. त्यामुळे आरोपींनी हुंडेकरी यांना सोडून दिले. हुंडेकरी बसने नगरला आले. तोपर्यंत हुंडेकरी यांचा मुलगा अफरोज अब्दुल करीम यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली होती.
नगरला आल्यानंतर हुंडेकरी यांनीही पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. एन. पिंगळे यांनी केला. त्यांना गुन्हे शाखेच्या पथकाने मदत केली. दरम्यान, पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यानंतर आरोपी अजहर शेख याला अटक करून दोषारोपपत्र दाखल केले. तपासादरम्यान हुंडेकरी यांनी दोन्ही आरोपींना ओळख परेड दरम्यान ओळखले. तसेच सर्व ठिकाणचे बस थांबे, टोलनाके जालना येथील एसटी स्टँड वरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला. गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींचा सहभाग होता त्यापैकी एक आरोपी फतेहसिद्दिकी अहमद अन्सारी हा अद्यापही फरार आहे, तर चौथा आरोपी बाल गुन्हेगार आहे. त्यामुळे हा खटला अझहर शेख आणि बाबा शेख यांच्यावर चालला. सरकारी पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी सर्व पुरावे ग्राह्य धरून दोन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा ठोठावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील अर्जुन पवार यांनी काम पाहिले. त्यांना मूळ फिर्यादीच्या वतीने वकील सतीश गुगळे यांनी सहाय केले.
------------
पीडिताचा जबाब आणि त्याप्रमाणे सर्व पुरावे तंतोतंत जुळले. इतर साक्षीदारही महत्त्वपूर्ण ठरले. त्यामुळे कमी वेळेत न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
-अर्जुन पवार, अतिरिक्त सरकारी वकील
..........
२२अर्जुन पवार