अहमदनगर : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी शिवसेनेच्या पुष्पा बोरुडे यांचा, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून मीना संजय चोपडा यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, काँग्रेसकडून एकही अर्ज दाखल करण्यात आला नाही.
महापालिकेच्या महिला व बालकल्याण समिती सभापती पदासाठी येत्या बुधवारी निवडणूक होत आहे. समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारी सुरुवात झाली. पहिल्या दिवशी सेनेच्या बोरुडे यांनी सभापती पदासाठी, तर उपसभापती पदासाठी राष्ट्रवादीच्या चोपडा यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, नगरसेवकांनी एकत्र येत सभापती व उपसभापती पदासाठीचे अर्ज दाखल केले. नगरसेविका पुष्पा बोरुडे यांच्या एका अर्जासाठी नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, तर दुसऱ्या अर्जासाठी सुरेख कदम सूचक आहेत. अनुमोदक म्हणून कमल सप्रे, शांताबाई शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राष्ट्रवादीच्या मीना चोपडा यांना नगरसेविका दीपाली बारस्कर सूचक, तर अनुमोदक म्हणून नगरसेविका शोभा बोरकर यांची स्वाक्षरी आहे. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, माजी महापौर शीला शिंदे, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, ज्येष्ठ नगरसेवक अनिल शिंदे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी महापौर सुरेख कदम, नगरसेविका शीतल जगताप, सुप्रिया जाधव, संभाजी कदम, नगरसेवक अशोक बडे, सचिन शिंदे, अनिल बोरुडे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, कुमारसिंह वाकळे, सचिन शिंदे, गणेश कवडे, शाम नळकांडे, संजय चोपडा, दगडू पवार, नगरसेवक रामदास आंधळे, बाळासाहेब बारस्कर, दत्ता सप्रे, अमोल येवले, संजय शेंडगे, नगरसेवक विजय पठारे, आशा निंबाळकर, स्मिता अष्टेकर, अरुणा गोयल, सुषमा पाडोळे आदी उपस्थित होते.
....
भाजप माघार घेणार का
महिला व बालकल्याण समिती सभापती, उपसभापती पदासाठी सत्ताधारी महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्यात आले. महापालिकेत भाजप विरोधात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार असल्याची चर्चा होती. परंतु, ऐनवेळी भाजपने अर्ज दाखल केला नाही. भाजपकडून उद्या मंगळवारी अर्ज दाखल केला जाणार की भाजप माघार घेणार, याची उत्सुकता आहे.
....
काँग्रेसला धक्का
महापालिकेतील महाविकास आघाडीत काँग्रेसही सहभागी असल्याचे महापौर निवडणुकीवेळी सांगण्यात आले होते. काँग्रेसला सत्तेत वाटा देण्याचे ठरले होते. काँग्रेसकडून सभापती पदासाठी रूपाली निखिल वारे, संध्या बाळासाहेब पवार यांची नावे चर्चेत होती. परंतु, ऐनवेळी गटनेत्या सुप्रिया धनंजय जाधव यांनी स्वत:चे नाव दिले. त्यांचे नाव उपसभापती पदासाठी चर्चेत होते. मात्र, त्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. राष्ट्रवादीच्या चोपडा यांचा अर्ज दाखल करताना जाधव यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता मावळली असून, काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जाते.
......
सूचना : फोटो १२ महापालिका नावाने आहे