अहमदनगर : कोरोना रुग्णांवरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिवरप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांत हजर होण्याबाबत वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना आयुक्तांनी कळविले होते, मात्र ते चौकशीसाठी अद्याप पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी महापालिकेला पत्र दिले असून, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
रेमडेसिविरचा काळाबाजार केल्याचा ठपका मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी बोरगे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी आवश्यक असलेला अहवाल आयुक्त शंकर गोरे यांनी पोलिसांना पाठिवला आहे. तसेच पुढील चौकशीसाठी बोरगे यांना पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यास आयुक्तांकडून सांगण्यात आले होते. तसे अधिकृत पत्रच त्यांनी बोरगे यांना दिले होते, परंतु बोरगे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर झाले नाहीत. त्यामुळे आयुक्तांनी बोरगे यांना याबाबत स्मरणपत्र धाडले. तरीदेखील बोरगे हे चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे कोतवालीचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी बोरगे हजर झाले नसल्याबाबतचे पत्र आयुक्तांना दिले आहे. हे पत्र महापालिकेला प्राप्त झाले आहे. दरम्यान, लॉकडाऊन असताना दालनात वाढदिवस साजरा केल्याने बोरगे यांना शनिवारी नोटीस बजावण्यात आली होती. याबाबतचा खुलासा बोरगे यांनी आयुक्तांना सादर केला आहे. त्यात त्यांनी काय म्हटले आहे हे पाहून कारवाई केली जाईल, असे आयुक्त गोरे यांनी सांगितले.
....
बोरगे यांच्यावरील कारवाईकडे लक्ष
रेमडेसिविर प्रकरण ताजे असतानाच दालनात वाढदिवस साजरा केल्याने वैद्यकीय आरोग्य अधिकारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. रेमडेसिविरप्रकरणी बोरगे हे चौकशीसाठी पोलीस स्टेशनला हजर झालेले नाहीत. विशेष म्हणजे आयुक्तांनी त्यांना दोन पत्र दिले; परंतु या पत्रांनाही बोरगे यांनी केराची टोपली दाखविली आहे. बोरगे यांच्यावर आयुक्त काय कारवाई करतात, याचीच चर्चा सध्या महापालिका वर्तुळात आहे.