श्रीगोंदा : लोणी व्यंकनाथ येथील सकल मराठा समाजाने मराठा, मुस्लिम व धनगर या समाजांना आरक्षण देण्याच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लोणी व्यंकनाथ येथील तरूणाईने मंगळवारी रक्तदान आंदोलन उभे करून नवा आदर्श निर्माण केला.या आंदोलनात सुमारे १०० जणांनी रक्तदान केले. हे रक्त जखमी आंदोलनकर्ते व अपघातग्रस्तांना देण्यात येणार आहे. आंदोलनास पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी भेट दिली. आंदोलन करणे हा जनतेचा अधिकार आहे, पण अलिकडे हिंसक आंदोलने होतात, ही दुर्देवी बाब आहे. लोणी व्यंकनाथमधील तरूणांनी कुणाचा तरी जीव वाचविण्याच्या भावनेतून आंदोलन केले ही चांगली बाब आहे, असे यावेळी सांगितले.नगर येथील अष्टविनायक रक्तपेढीचे डॉ. दिलीप दाळे, डॉ. संदीप पाटोळे, सिद्धार्थ जोगदंड, महेश करांडे, डॉ. वरलक्ष्मी श्रीपत, डॉ. नलिनी मुसळे, डॉ. संजय मुळे, उषा ओव्हळ यांनी ही रक्तदानासाठी प्रयत्न केले.रक्तदान शिबीर आयोजित करण्यासाठी नामदेव जठार, राजेंद्र काकडे, सुहास काकडे, भास्कर कुंदाडे, दीपक गुंड, रामदास काकडे, भरत काकडे, नामदेव काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
आरक्षणासाठी रक्तदान आंदोलन : १०० जणांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 12:34 IST