शेवगाव : जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेल्या शेवगाव जि. प. गटाच्या पोटनिवडणुकीच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारून ही जागा भाजपकडून हिसकावून घेण्यात यश मिळविले आहे. अत्यंत अटीतटीच्या व चुरशीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे शिवाजी नेमाणे यांना ३ हजार २९१, भाजपचे नितीन काकडे यांना २ हजार ६३३ मते मिळाली. या निवडणुकीत भाकपचे तिसरे उमेदवार भाऊसाहेब भुसे यांना अवघी ११८ मते मिळून त्यांची अनामत जप्त झाली आहे.जिल्हा परिषदेच्या शेवगाव गटाचे भाजपाचे सदस्य अशोक आहुजा यांची शेवगाव नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून निवड झाल्याने त्यांनी आपल्या जि. प. सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त असलेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. विजयी सदस्याला केवळ ८ ते ९ महिन्याचा कार्यकाळ मिळणार असला तरी, पुढील पंचवार्षिक निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या पोटनिवडणुकीस मोठे महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले यांनी आपल्या होमग्राऊंडवर होणारी ही निवडणूक आगामी राजकारणाच्या दृष्टीने प्रतिष्ठेची करून कोणत्याही परिस्थितीत भाजपकडील ही जागा आपल्याकडे खेचण्याच्या निर्धाराने प्रचाराचे नियोजन केले. मतदारसंघात चापडगाव, ठाकूर निमगाव, राक्षी, माळेगाव ने, वरखेड, सोनेसांगवी व मंगरूळ खुर्द ही सात गावे समाविष्ट होती. यातील मंगरूळ खुर्द व ठाकूर निमगाव येथे भाजपाला मताधिक्य मिळाले तर उर्वरित गावात राष्ट्रवादीने वर्चस्व राखले. या गटातील मोठे गाव असलेल्या चापडगाव येथील स्थानिक उमेदवार देऊन राष्ट्रवादीने पहिल्याच टप्प्यात उचल खाल्ली. याउलट भाजपने मात्र बाहेरचा उमेदवार लादल्याने मतपेटीत या बाबींचे पडसाद उमटले.सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात मतमोजणीस सुरुवात झाली. मतमोजणीसाठी दोन टेबल मांडण्यात आले होते. अवघ्या अर्ध्या तासात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दादासाहेब गिते यांनी निकाल जाहीर केला. विजयी उमेदवार नेमाणे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करीत मोठी मिरवणूक काढली. बाजार समिती आवारात ज्येष्ठ नेते अरुण लांडे यांच्या अध्यक्षतेखाली विजयी सभा पार पडली. यावेळी बाजार समितीचे सभापती संजय फडके, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, केदारेश्वरचे उपाध्यक्ष माधव काटे, रामनाथ राजपुरे, संजय शिंदे, राजेंद्र दौंड, हनुमान पातकळ, राम अंधारे, शरद सोनवणे, नवनाथ इसारवाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
शेवगाव गटात भाजपाचा धुव्वा
By admin | Updated: April 19, 2016 00:14 IST