दहिगावने : बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. आता शेवगाव तालुक्यातील दहिगावने गटातील भाजप पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा उपाध्यक्ष वाय. डी. कोल्हे, अल्पसंख्याक सेलचे जिल्हा चिटणीस बशीर पठाण, जिल्हा कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ माळवदे, शेवगाव तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे यांनी पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे सुपुर्द केले आहेत.
राज्यात भाजप पक्ष वाढविण्यात स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे कामकाज करत आहेत. मुंडे भगिनींना मानणारा मोठा वर्ग शेवगाव-पाथर्डी तालुक्यात आहे. त्यामुळेच या विधानसभा मतदार संघात मुंडे भगिनींच्या हक्काच्या मतांच्या पाठिंब्यावर येथील लोकप्रतिनिधीही दोनदा विधानसभेत गेल्या आहेत. असे असतानाही दोनदा खासदार म्हणून विक्रमी मतांनी निवडून आलेल्या डॉ. प्रीतम मुंडे यांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळाले नाही, असे निवेदनात म्हटले आहे.