घारगाव : कोरोनामुळे परिस्थिती गंभीर बनली असताना उपचारांसाठी सामान्य माणसांची धावपळ सुरू आहे. सोने विकून ऑक्सिजन घेण्याची वेळ आली आहे. याला केंद्र सरकार जबाबदार असून, वाईट काळातही भारतीय जनता पक्षाचे नेते राजकारण करत आहेत, अशी टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये डॉ. राहुल आहेर व डॉ. संतोष फटांगरे यांनी सुरू केलेल्या शासनमान्य कोविड केअर सेंटरच्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरला रविवारी (दि. १८) तांबे यांनी भेट दिली. रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा लपवून ठेवलेल्या एका कंपनीच्या मालकाला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे त्याच्या सुटकेसाठी पोलीस ठाण्यात गेले. जेथे सामान्य माणसाला एक इंजेक्शन मिळणे अवघड आहे, अशावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडे पन्नास हजार इंजेक्शन येतात कशी? हे अतिशय खालच्या पातळीवरील राजकारण असून, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, असेही तांबे म्हणाले. यावेळी अकोले विधानसभा मतदार संघाचे आमदार डाॅ. किरण लहामटे, जिल्हा परिषदेचे गटनेते अजय फटांगरे, पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, सामाजिक कार्यकर्ते नितीन आहेर, ॲड. सुहास आहेर, बोट्याचे उपसरपंच पांडुरंग शेळके, रमेश आहेर, संदीप आहेर, बाबासाहेब कुऱ्हाडे, जगदीश आहेर, नवनाथ आहेर, निखील कुरकुटे, चेतन कजबे, डॉ. दत्ता हांडे, डॉ. सुभाष भोर, अतुल आहेर, दिनेश पावडे, आदी उपस्थित होते.