जामखेड : धनगर, मराठा, मुस्लिम समाजाला पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण दिले जाईल अशी गर्जना बारामती येथे येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता चार वर्षे झाली तरी त्यांना आरक्षणाचा निर्णय घेता येईना. हे मुख्यमंत्री खोटारडे असून खोटे बोल पण रेटून बोलत आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मी लोकसभेत प्रश्न मांडला पण आरक्षण देता येणार नाही असे संबधीत मंत्र्यानी सांगितले होते. या सरकारने या सर्वांची फसवणूक केली आहे. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. खासदार सुप्रिया सुळे चोंडी येथे आल्या असता त्यांनी अहिल्यादेवीचे दर्शन करून गढीची पाहणी केली. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.खासदार सुळे म्हणाल्या, पालघर निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची क्लिप प्रसिद्ध झाली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी वापरलेली भाषा अशोभनीय आहे. निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार झाली आहे. त्याची दखल घेऊन निवडणूक अधिका-यांनी कारवाई करावी. नगर जिल्ह्यातील कोपर्डी, केडगाव, जामखेड येथील दुहेरी हत्याकांडामुळे कायदा व सुव्यवस्था स्थिती ढासळली आहे. याला जबाबदार मुख्यमंत्रीच असून त्यांच्याकडे गृहखाते आहे. गृहखाते निष्प्रभ ठरले आहे, असेही सुळे म्हणाल्या.
आरक्षणाबाबत भाजपकडून फसवणूक - खासदार सुप्रिया सुळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 18:35 IST