श्रीगोंदा : बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरातील होनराव चौकात होनराव शाळेच्या गेटसमोर सापडलेले मृत कबूतर व भानगाव येथील मृत कावळा यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये कावळ्याला बर्ड फ्ल्यू झाल्याचे स्पष्ट झाले तर कबुतराचा अहवाल निगेटिव्ह आढळला, असे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. आर. जी. वसमतकर यांनी सांगितले.
पुण्यातील औंध येथील डीआयएस या संशोधन केंद्रामध्ये ही तपासणी करण्यात आली. तेथेच दोन्ही पक्षी उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले.
भानगावमध्ये ज्या ठिकाणी कावळा मृतावस्थेत आढळला त्या परिसरासह आसपास कोंबड्यांची खुराडी व पोल्ट्री फार्म तसेच जवळच्या कार्यक्षेत्रामध्ये सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात येत असल्याचे डॉ. वसमतकर यांनी सांगितले.
संक्रमित पक्ष्यांच्या प्रवासातून हा प्रादुर्भाव इतर पक्ष्यांत वाढत जातो. ज्या ठिकाणी कुक्कुटपालन किंवा कोंबड्यांची खुराडी असतील अशा ठिकाणी स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.