कांदा गेल्या काही वर्षांपासून आयात निर्यात धोरणात आल्याने बाजारभावाची अनिश्चितता व अचानक पन्नास ते शंभर रुपये किलोचे भाव येत असल्याने अनेक शेती व कृषी व्यापाराशी संबंधित पैसेवाले तयार झाले. यंदा मोठ्या भाववाढीच्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात कांदा खरेदी केली.
भारतात दरवर्षी १२ लाख हेक्टरवर, तर महाराष्ट्रात साडेचार लाख हेक्टर क्षेत्रात कांदा लागवड होते, तर नगर जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टरवर कांदा उत्पादन होते. यंदा भात क्षेत्र असलेल्या अकोलेत विक्रमी २८०० हेक्टरवर कांदा लागवड झाली; मात्र यातील ८० टक्के कांदा साठवणुकीसाठी कुलूप बंद झाला आहे.
महाराष्ट्र राज्याची कांदा साठवण क्षमता १४ लाख टन इतकी आहे; मात्र हे प्रमाण यंदा वीस टक्के वाढले. भाववाढ व जुलै ऑगस्ट महिन्यांत दुप्पट होतात, या अंदाजावर कांदा व्यापाऱ्याबरोबरीने विविध विभागांतील शासकीय नोकर, अकृषक व्यापारी, राजकीय नेते, किराणा, कापड, बांधकाम, ॲटोमोबाईल्स, कटलरी अशा व्यावसायिकांनी कांदा खरेदी करून तो साठविला आहे. काही शेतकऱ्यांनी उसनवार, कर्ज, घरातील दागिने गहाण ठेवून घरच्या कांद्याबरोबर बाहेरून आणून साठविला आहे.
विशेष म्हणजे यासाठी काहींनी हा कायमचा धंदा म्हणून मोठी गोडावून उभारली, तर काहींनी छोट्या चाळी उभारल्या. काहींनी भाड्याच्या चाळी, जुन्या इमारती, गोठे भाडे तत्त्वावर घेतले. त्यामुळे फेब्रुवारी ते जून दरम्यान कांदाचाळीचे साहित्याची तीस टक्के जादा दराने विक्री झाली.
मार्च ते मेअखेर ही खरेदी दहा ते पंधरा रुपये किलो दराने झाली. अनेकांनी पर जिल्ह्यातील माल मध्यस्थांमार्फत खरेदी केला आहे. सध्या दररोज हे गुंतवणूकदार ऑनलाईन कांदा बाजारभाव शेअर बाजाराप्रमाणे पाहतात, तर जाणकारांच्या सल्ल्यानुसार माल विकायचा निर्णय घेतात.
केंद्र सरकारने केवळ पॅनकार्डवर शेताच्या बांधावर जाऊन खरेदी करण्याचे धोरण अवलंबले. शेतकऱ्यांनाही दोन पैसे जास्त मिळत असले तरी याचाच फायदा घेत अनेक सरकारी बाबू आपली नोकरी विसरून या धंद्यात उतरले. मात्र, साठवणूक, दरवाढीने तुटवडा निर्माण झाल्यास अन्न नागरी व ग्राहक संरक्षण मंत्रालय अतिरिक्त साठेबाजांवर नजर ठेवेल का? तर स्थानिक ठिकाणी पणन विभाग काय भूमिका घेणार हे गुलदस्त्यातच आहे.
...............
कांदा व्यापारात आम्ही चाळीस वर्षे काम करतो. यंदा कांदा व्यापाराशी संबंधित नसलेल्यांनी मोठ्या प्रमाणात साठवणुकीसाठी पैसे लावले. परंतु, कोणता कांदा साठवायचा हे माहिती नसल्याने चाळी सडू लागल्या. पुढील पंधरा दिवसांत या चाळी व शेतकरी चाळीतला माल बाजारात येईल. बाजारभाव पावसाच्या स्थितीवर अवलंबून असतात.
-नितीन देशमुख, कांदा व्यापारी.