दहिगावने : शेवगाव तालुक्यातील भाविनिमगाव ग्रामस्थांच्या एकजुटीतून दिवसेंदिवस भावीनिमगावाच्या वैभवात भर पडत आहे. येथे लोकवर्गणीतून विकासकामांची घोडदौड सुरुच असून गावात ऐतिहासिक वास्तू साकारत आहेत. आता गावाच्या वैभवात भर घालणारे वैकुंठवासी विठ्ठलनाथ महाराजांचे समाधीस्थळ असलेल्या आनंद साधकाश्रमाला संरक्षक भिंत बांधण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत.
बुधवारी (दि.२७) हनुमान मंदिरात सभा झाली. यावेळी लोकवर्गणीतून हे काम पूर्ण करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला. अंदाजे ५ ते ६ लाखांच्या निधीची गरज असलेल्या या कामासाठी ग्रामस्थांनी प्रतिसाद देत ७१ हजारांचा निधी लगेच देऊ केला.
या आधी गावकऱ्यांनी लोकवर्गणीतून गावातील पुरातन हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार करून हनुमान मंदिराची संरक्षक भिंत बांधली. पुरातन पडक्या वेशीचे बांधकाम केले. श्री दत्त मंदिर व आनंद साधकाश्रमाची उभारणी केली. नुकतेच ४१ लाख रूपये अंदाजपत्रकीय रक्कम असलेले भव्य शिवस्मारक गावात साकारले गेले असून सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. गाव ठरवेल ते कार्य पूर्णत्वास जाते, असा येथील इतिहास आहे. त्यामुळे अनेक सार्वजनिक कार्यात गावचे ऐक्य नेहमी दिसून येत असते.