अहमदनगर : आपण किती झोप घेतो, त्यावरच आपले आरोग्य अवलंबून असते. अवयव व मेंदू दिवसभर क्रियाशील असल्याने त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. रात्री कमी झोप घेतल्यास दुसऱ्या दिवशी काम करण्यास ऊर्जा मिळत नाही. त्याचे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे दररोज किमान सहा ते सात तास झोप घेणे जरुरीचे आहे.
कोरोना टाळण्यासाठी शरीरातील प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी अनेक उपाय केले जात आहेत. गेल्या दोन वर्षांपासून जगभर कोरोनाने थैमान घातलेले आहेत. कोरोनामुळे अनेकांनी जवळचे नातेवाईक गमावलेले आहेत. कोरोनापासून धडा घेऊन अनेकजण आरोग्याची काळजी घेऊ लागले आहेत. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहारासोबतच रात्रीची झोपदेखील तितकीच महत्त्वाची आहे. पुरेशी झोप झाल्यास मानसिक व शारीरिक संतुलन टिकून राहते. झोप कमी झाल्यास कार्यशीलता मंदावते. मेंदूकडून दिल्या जाणाऱ्या आदेशाच्या अंमलबजावणीची क्रिया काहीशी मंदावते. तसेच मानसिक व शारीरिक स्वास्थ्यही बिघडते. रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होतो.
.......
किमान ६ तास झाेप आवश्यक
ज्येष्ठांसह वृद्धांना दररोज किमान ६ ते ७ झोप आवश्यक आहे. लहान मुले १० ते १२ तास झोप घेतात. त्यामुळे लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते. ज्येष्ठ व वृद्धांची झोप होत नाही. त्यामुळे अवयव व मेंदूला विश्रांती मिळत नाही. परिणामी आरोग्य बिघडते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
........
अपुऱ्या झाेपेचे तोटे
अपुऱ्या झोपेमुळे अवयव, पेशी मेंदूला आराम मिळत नाही. क्रियाशीलता शिथिल होते. परिणामी आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. याकडे सतत दुर्लक्ष केल्यास शरीर रोगाला बळी पडते. हे टाळायचे असेल तर नियमित पुरेशी झोप घेणे जरुरीचे आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
.....
संतुलित आहार आणि व्यायाम आवश्यकच
पुरेशी झोप आवश्यक आहेच. त्याचबरोबर संतुलित आहार आणि नियमित व्यायाम गरजेचा आहे. पालेभाज्या, फळांचा आहारात समावेश असावा. तसेच दररोज व्यायाम ही तितकाच महत्त्वाचा असून, त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहते.
....
प्रत्येकाला किमान ६ ते ७ तास झोप गरजेची आहे. पुरेशी झोप न झाल्यास त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे किमान ६ ते ७ झोप घेणे आवश्यक असून, त्यासोबतच नियमित व्यायाम करणेही जरुरीचे आहे.
- डॉ. सतीश राजूरकर, आरोग्य अधिकारी, महापालिका